टॉप स्टोरी राजकारण

रवींद्र चव्हाणांच्या ‘मिशन महाराष्ट्र’ची नवी फळी जाहीर; कोणाचे पंख कापले अन कोणाला मिळाली उभारी?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर आपल्या टीमची घोषणा करत राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गेली अनेक महिने लांबणीवर पडलेल्या या निवडींमध्ये अनुभवी नेत्यांना सामावून घेतानाच, आगामी निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून अनेक ‘सरप्राईज’ देण्यात आले आहेत. विशेषतः गोपीचंद पडळकर आणि कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक यांच्याकडे सोपवलेल्या जबाबदाऱ्यांमुळे भाजपच्या नव्या रणनीतीची चर्चा सुरू झाली आहे.

बढती, नियुक्ती आणि धक्का!

या कार्यकारिणीत सर्वात मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे प्रवक्ते पदावरून थेट उपाध्यक्षपदी झेप घेणाऱ्या केशव उपाध्ये यांची. त्यांच्या जागी आता नवनाथ बन हे भाजपचे नवे ‘मुख्य प्रवक्ते’ म्हणून पक्षाची बाजू मांडणार आहेत. उपाध्यक्ष पदाच्या फळीत माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार प्रवीण पोटे, रामदास तडस, सुजय विखे, अर्चना पाटील चाकूरकर आणि प्रिया शिंदे यांच्यासारख्या दिग्गज चेहऱ्यांचा समावेश करून पक्षाने प्रादेशिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.

विभागीय तगड्या नेत्यांकडे संघटनात्मक धुरा

संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सरचिटणीस पदी निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे आणि सुनील राणे यांची वर्णी लागली आहे. तर, कोकणपासून विदर्भापर्यंत पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय फुके, राम सातपुते, प्रवीण घुगे आणि वर्षा ढहाळे यांच्यासह १२ चिटणीसांची फौज मैदानात उतरवण्यात आली आहे.

मोर्चांच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंग

भाजपने आपल्या विविध आघाड्यांच्या (मोर्चा) माध्यमातून समाजातील सर्व घटकांना साद घातली आहे:

युवा मोर्चा: कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक यांच्याकडे तरुणाईला सांधण्याची मोठी जबाबदारी दिली आहे.
महिला मोर्चा: आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चित्रा वाघ यांच्याकडे पुन्हा एकदा महिला आघाडीचे नेतृत्व सोपवले आहे.
ओबीसी व इतर मोर्चा: योगेश टिळेकर (OBC), विश्वजित गायकवाड (SC), देवराव होळी (ST), नरेंद्र पवार (भटके विमुक्त) आणि इद्रिस मुलतानी (अल्पसंख्याक) यांच्या निवडीतून भाजपने सोशल इंजिनिअरिंगवर भर दिला आहे.
तिजोरीची चावी आणि पडद्यामागचे शिलेदार

आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडे पुन्हा एकदा ‘कोषाध्यक्ष’ म्हणून विश्वास दर्शवण्यात आला आहे, तर अरुण लखानी त्यांच्या सोबतीला असतील. मुख्यालय प्रभारी म्हणून रवींद्र अनासपुरे आणि सहप्रभारी म्हणून विश्वास पाठक पक्षकार्यालयाची सूत्रे सांभाळणार आहेत.

कार्यकर्त्यांना चव्हाणांचा शब्द

“पदाधिकाऱ्यांची निवड करताना राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यातील प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. संधी मर्यादित असली तरी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे. ज्यांना या यादीत स्थान मिळाले नाही, त्यांना भविष्यात इतर माध्यमांतून नक्कीच संधी दिली जाईल,” अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

नव्या दमाचे चेहरे आणि अनुभवी जुन्या जाणत्यांच्या या मिलाफामुळे भाजप आता राज्यात अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *