काँग्रेसचे विधिमंडळातील बाळासाहेब थोरात यांनी आपण काँग्रेस सोडणार नाही, असे जाहीर केले आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे जुनेजाणते नेते आहेत. त्यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचा गेम करून आपल्या काँग्रेस आमदार वडिलांच्या आशीर्वादाने अपक्ष निवडणूक लढविली आणि मोठ्या फरकाने ते निवडून आले. तांबे गेले म्हणून मग थोरात नावाचे सोनेही जाईल, अशी अनेकांची अटकळ होती. पण आज बाळासाहेबांनी आपली दिशा स्पष्ट केली आणि आपण काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक आहोत, असे सांगून आपली निष्ठा जाहीर केली. नाना पटोले यांच्या काही निर्णयाबाबत थोरातांची नाराजी होती. ती त्यांनी बोलूनही दाखविली.
त्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत दोघांची दिलजमाई झाली, असे जाहीर करण्यात आले. पण आज बाळासाहेबांनी आणखी एक वाक्य उच्चारले. ते वाक्य म्हणजे काँग्रेसच्या रायपूर अधिवेशनात तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. ही ब्रेकिंग न्यूज नाना पटोले यांच्याबाबाबत असेल काय? काँग्रेसने निरीक्षक म्हणून वरिष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांना पाठवले होते. त्यांच्याशी चर्चा झाल्यावरच बाळासाहेबांनी बातमी मिळणार आहे, अशी ब्रेकिंग न्यूज दिली. काँग्रेसश्रेष्ठींना आता आपले सैनिक जपून ठेवायचे आहेत, असे दिसते. आता रहायचे आहे तर राहा आणि जायचे आहे तर जा, हे जे धोरण होते ते बहुधा बदलले असावे. आतापर्यंत ज्यांना जायचे होते ते गेले पण बाळासाहेब थोरातांसारखे मैलाचे दगड काँग्रेसला हवे आहेत, असेच दिसते. लवकरच रायपूरला बऱ्याच घडामोडी घडतील आणि बाळासाहेब संतुष्ट होतील, अशी आशा करण्यास हरकत नाही.