टॉप स्टोरी राजकारण

दरेकरांच्या गाडीत शशिकांत शिंदे; ‘त्या’ एका प्रवासामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात संशयाचा धूर!

मुंबई, विशेष प्रतिनिधी :राज्याच्या राजकारणात शत्रू आणि मित्र यांच्यातील रेषा किती धूसर असते, याचा प्रत्यय आज विधान भवनाच्या परिसरात पुन्हा एकदा आला. भाजपचे संकटमोचक आमदार प्रविण दरेकर आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या दोन टोकाच्या विचारधारेच्या नेत्यांनी चक्क एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय तज्ज्ञांच्याही भुवया उंचावल्या आहेत. गाडीच्या काचा बंद असल्या तरी, या प्रवासाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मात्र खळबळ माजवून दिली आहे.

मैत्रीचा ‘स्टॉप’ की नव्या युतीचा ‘हायवे‘?

नेहमी एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे हे दोन्ही नेते एकाच वाहनात काय चर्चा करत होते, याचे गूढ अद्याप कायम आहे. मात्र, गाडीतून उतरल्यावर प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना टाकलेला ‘बॉम्ब’ अधिकच स्फोटक ठरला. “आम्ही केवळ आजच नाही, तर यापुढेही तुम्हाला अशाच प्रकारे एकाच गाडीत दिसू,” असे सूचक विधान दरेकर यांनी केले. दरेकरांच्या या एका विधानाने शशिकांत शिंदे यांच्या राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मविआच्या गोटात कमालीची अस्वस्थता

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीच्या गोटात आधीच शांतता असताना, शरद पवारांचा एक खंबीर शिलेदार भाजप नेत्याच्या इतक्या जवळ गेल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. राज्यसभेच्या एका जागेवरून आधीच काँग्रेस, उबाठा आणि पवार गटात रस्सीखेच सुरू असताना, शिंदेंचा हा प्रवास एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी तर नाही ना, अशी भीती विरोधकांना सतावत आहे.

दरेकरांचे विधान आणि भविष्यातील गुपिते

प्रविण दरेकर यांनी भविष्यातही एकत्र दिसण्याचे जे संकेत दिले आहेत, त्यावरून पडद्यामागे काहीतरी मोठी ‘राजकीय फिल्डिंग’ लावली जात असल्याचे बोलले जात आहे. हा केवळ योगायोग होता की शशिकांत शिंदेंना महायुतीच्या प्रवाहात आणण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल आहे, या प्रश्नाचे उत्तर सध्या मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये शोधले जात आहे. आजच्या या एका प्रवासामुळे आगामी काळात शशिकांत शिंदे खरंच भाजपच्या ‘गाडीत’ कायमचे स्वार होणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *