टॉप स्टोरी राजकारण

अजितदादाच होणार होते एकसंध राष्ट्रवादीचे ‘नवे बॉस’ आणि अमोल कोल्हेंकडे प्रदेशाध्यक्षपद? पुण्यात शिजलेला तो विलीनीकरणाचा ‘मास्टर प्लॅन’ काय होता?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासाठी गेल्या वर्षभरापासून गुप्त बैठकांचे सत्र सुरू होते, ज्याची निर्णायक बैठक १६ जानेवारी २०२६ रोजी पुण्यात पार पडली. या बैठकीत ठरलेल्या सत्तावाटपाच्या सूत्राची अत्यंत विश्वासार्ह माहिती आता समोर आली आहे.

विलीनीकरणाचे ‘पॉवर’ सूत्र काय होते?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गट एकत्र आल्यानंतर निर्माण होणाऱ्या एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांचेच नाव निश्चित करण्यात आले होते. राज्याचे नेतृत्व आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडेच राहणार होते. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रीय राजकारण आणि संसदेतील नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाणार होती.

डॉ. अमोल कोल्हे आणि नव्या नेतृत्वाचा उदय

या प्लॅनमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाचा होता. जुन्या आणि नव्या पिढीचा समन्वय साधण्यासाठी लोकप्रिय खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचे ठरले होते. जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्याकडे संघटनेतील इतर महत्त्वाची पदे देऊन भविष्यातील राष्ट्रवादीची बांधणी करण्याचे संकेत या बैठकीत मिळाले होते. या प्रक्रियेला ‘एनडीए’च्या वरिष्ठ नेत्यांनीही संमती दिली होती, असा दावा केला जात आहे.

शरद पवारांचे प्रत्युत्तर आणि सुनेत्रा पवारांची मागणी

या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “आमच्या बैठकीत काय चर्चा झाली, हे बाहेरच्यांना कसे माहित?” असा सवाल करत त्यांनी अंतर्गत हालचाली गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता अजितदादांच्या निधनानंतर पक्षातील ३० हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवावे, अशी लेखी मागणी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याकडे केली आहे.

अजितदादांनी विलीनीकरणासाठी जो फॉर्म्युला तयार केला होता, तो आता त्यांच्या पश्चात अमलात येणार की राष्ट्रवादीच्या राजकारणाला पुन्हा नवी दिशा मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *