टॉप स्टोरी राजकारण

दिल्लीच्या दरबारी कुणाची लागणार वर्णी? भाजपच्या यादीत ‘हे’ दिग्गज; तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांबाबत मोठा निर्णय!

मुंबई, विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या रणांगणाची जोरदार तयारी सुरू असून, महायुतीमधील जागांचे समीकरण आता जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप कोअर कमिटीच्या १२ प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या खलबतांमध्ये उमेदवारांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीवर आता दिल्लीत शिक्कामोर्तब होणार असून २८ फेब्रुवारीपर्यंत चित्र स्पष्ट होईल.
भाजपकडून राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि प्रितम मुंडे यांसारख्या मोठ्या नावांची चर्चा आहे. विजया रहाटकर आणि भागवत कराड यांना पुन्हा संधी मिळते की नवीन चेहरा समोर येतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील १३१ आमदारांच्या बळावर भाजप ३ ते ४ जागा सहज जिंकण्याच्या तयारीत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ही नावे घेऊन लवकरच राष्ट्रीय नेतृत्वाची भेट घेणार आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सर्वात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. सोमवारी रात्री देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयावर मोहोर उमटवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, २६ फेब्रुवारी रोजी वरळीत होणाऱ्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे. अजित पवारांनंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर देऊन भावनिक आणि राजकीय समीकरण साधण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे, शायना एनसी आणि संजय निरुपम यांच्या नावांची चर्चा असली, तरी संख्याबळानुसार त्यांच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे. शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि फौजिया खान यांसारख्या ७ दिग्गजांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. महायुतीच्या या ‘मेगा प्लॅनिंग’मुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *