अमेरिका आणि अमेरिकेचे स्वनामधन्य अध्यक्ष कधी काय करतील याचा त्यांना त्यांनाही पत्ता नसतो. अमेरिकेच्या न्यायालयाने टेरिफच्या मुद्द्यावर या ट्रम्पला चक्क जोकरच करून टाकलेला आहे. कोणावर दहा टक्के, कोणावर 20%, कोणावर 50 टक्के तर कोणावर 100% असे वेगवेगळे टेरिफचे धडे अमेरिकेच्या विद्यार्थ्यांना गिरवावे लागतील असे दिसते. जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेला देश किती कर्जबाजारी आहे याची चौकशी केली असता, जे सत्य बाहेर आले ते अमेरिकेच्या तोंडचे पाणी पळवणारे आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष होईल असे अनेक दिवसांपासून बोलले जात आहे. पण सर्वाधिक श्रीमंत असलेल्या देशाला इराण भीक घालायला तयार नाही. वेगवेगळ्या मुद्द्यावरून धमक्या दिल्यानंतरही इराण अमेरिकेची दादागिरी सहन करीत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि तसे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना दाखवूनही दिले आहे. इराणला धडा शिकवण्यासाठी चारीही बाजूंनी घेरून त्याची मुसकटदाबी करण्याचा प्रयोग आता अमेरिकेच्या अंगलट येणार आहे असे दिसते. अमेरिकन लष्कराच्या सर्वोच्च कमांडरने इराणवर हल्ला करणे म्हणजे आपला आत्मघात करण्यासारखे आहे असे सांगून टाकले आहे.
त्यामुळे आता इराण आणि अमेरिकेचे युद्ध सुरू झाले तर त्याचे नुकसान इराणला सोसावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकन सैन्याच्या सर्वोच्च कमांडरने इराणवर हल्ला करण्याच्या निर्णयाला मात्र मंजुरी दिलेली नाही त्या उलट असा हल्ला करणे, आत्मघात ठरेल असे त्यांनी ट्रम्प यांना सुनावलेले आहे. त्यामुळेच की काय गेले अनेक दिवस अमेरिका आज चढाई करणार किंवा उद्या चढाई करणार, यामध्येच वेळ वाया जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पारितोषिक हवे होते. पण आता ट्रम्पची प्रतिमा युद्धखोर म्हणून जगभर हेटाळली जात आहे ट्रम्पच्या लहरीपणामुळे दररोज अमुक देशाला अमुक टेरिफ, प्रमुख देशाला प्रमुख टेरिफ असे लहरीपणाचे फतवे जगजाहीर होत आहेत.
त्यातच अमेरिकेला आता फारसे मित्रही राहिलेले नाहीत. युरोपीय देश आतापर्यंत अमेरिकेच्या तंत्राप्रमाणे चालत असत. सध्या ते देशही ट्रम्पचा खुला निषेध करीत आहेत. अमेरिकेची आंतरिक परिस्थिती सुद्धा संकटग्रस्त आहे. अमेरिकी जनतेला आणखी तीन वर्षे तरी या ट्रम्पला झेलायचे आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील मतभेद अगदी वरच्या टप्प्यापर्यंत ताणले गेलेले आहेत. आता ट्रम्प शांतता वगैरेची भाषा करत नाही. ट्रम्पच्या एकूण राहणीमानात आणि त्याच्या बोलबच्चन स्वभावात फारसा बदल होईल असे वाटत नाही. भविष्यकाळात इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध झाले नाही, तर या पृथ्वीवर कृपा होईल. इति ट्रम्पाख्यानम् संपूर्णम्!



