दक्षिण अमेरिकेत व्हेनेझूएला नावाचा एक देश आहे. या देशात मोठ्या प्रमाणावर तेल उपलब्ध आहे. त्या देशात अनेक वर्षापासून निकोलस मादूरो नावाच्या व्यक्तीची सत्ता आहे, तो गेल्या वीस वर्षापासून तेथील राष्ट्रपती आहे. त्याने आपल्या देशातील तेलाचा व्यापार करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, त्या कंपन्यांना या देशातून तेल निर्मितीमुळे मोठाच नफा होत होता. त्यानंतर ट्रम्प नावाच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या देशातील कंपन्यांच्या म्हणजे त्यांच्या मालकांच्या फायद्यासाठी जे पाऊल उचलले आहे ते थरकाप उडवणारे आहे.
एका देशाच्या राष्ट्रपतीला भर मध्यरात्री तो निद्रिस्त असलेल्या बेडरूम मधून जबरदस्त आक्रमण करून त्याचे अपहरण करणे आणि त्याला हातकडी घालून अमेरिकेपर्यंत आणणे ही तर दादागिरीचीच नव्हे तर डाकूगिरीचीही पराकाष्टा आहे. 1962 सालात अमेरिकेच्या जवळील क्युबा देशाचा अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो होता त्याला सोवियत संघाचा जबरदस्त पाठिंबा होता. त्या वेळचे अध्यक्ष अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी क्युबाला धमकी दिली होती की जर फिडेल कॅस्ट्रो याने अमेरिकेचा विरोध केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ही गोष्ट कळताच रशियाच्या क्रुश्चेव्ह यांनी क्युबाच्या मदतीला चार अण्वस्त्रे पाठवली त्यामुळेच केनेडीला भविष्यातील धोका ओळखून गप्प बसावे लागले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर जग दोन महाशक्तींमध्ये विभागले गेले.
अमेरिकेच्या निक्सनने बांगला देशच्या लढाईत आपल्या भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना धमकी दिली होती. त्यावेळी इंदिराजींनी सोवियत संघाबरोबर करार करून त्यांच्याही तोडीसतोड सुरक्षा प्रणाली आणण्याची तयारी केली होती. तेव्हाही निक्सनला माघार घ्यावी लागली याचे कारण अमेरिकेला आणि अमेरिकेच्या धमकीला पुरून उरेल अशी शक्ती सोवियत संघाजवळ होती. त्यानंतरच्या पुढील पंधरा वर्षात याच बलाढ्य सोवियत संघाचे तुकडे तुकडे झाले, सोवियत संघ उरला नाही त्यामुळे रशियाची शक्ती मर्यादित झाली. आजचा रशिया एकेकाळी त्याचा सहकारी असलेल्या युक्रेनला गेल्या चार वर्षात जिंकू शकत नाही ही सध्याची वस्तूस्थिती आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, जगात अमेरिका सर्वात शक्तिशाली आहे आणि त्यांना जे वाट्टेल ते वाट्टेल तिथे करतील. मध्यंतरी अमेरिकेने खोटे आरोप करून सद्दाम हुसेनला मारून टाकले. सध्याच्या स्थितीमध्ये व्हेनेझुएला देशाच्या अध्यक्षाला आपण अध्यक्ष मानतच नाही. असा आरोप करून अमेरिकेने जागतिक डाकूगिरी करत एका देशाच्या राष्ट्रपतीचे अपहरण ट्रम्पने केले असे म्हणण्यापेक्षा त्याला उचलले असे म्हणणेच योग्य ठरेल.
व्हेनेझुएला या देशांमध्ये संघीय प्रजासत्ताक आहे असे म्हणतात. त्या अध्यक्षाला तेथील जनतेने निवडून दिले होते अशा लोकनिर्वाचित अध्यक्षाला बंदी बनवून अमेरिकेत आणले गेले आहे. आता तर म्हणे अमेरिकेत त्याच्यावर खटला चालणार आहे. या दरोडेखोरी विरुद्ध जगात अनेक देशांनी ट्यावट्याव केले आहे. चीन, रशिया, ब्राझील, ब्रिटन, आणि इटली यासारखे इतर अनेक देश याबाबत विरोधी सूर काढत आहेत. यातील अनेक राष्ट्रे ब्रिक्स नावाच्या संघटनेची सदस्य आहेत, त्याच ब्रिक्स संघटनेत भारतही आहे.
ट्रम्पने केलेल्या या हल्ल्याचे आणि अपहरणाचे अमेरिकेतील कंपन्यांनी समर्थन केलेले आहे. त्यातच ट्रम्पने आता खुलेआम घोषणाच करून टाकलेली आहे की, अमेरिकेच्या त्याच कंपन्या व्हेनेझुएला येथे पुन्हा कार्यरत होतील. त्या देशात संपूर्ण जगातील दहा टक्के तेल आहे असे म्हणतात, त्यामुळेच अमेरिकेच्या कंपन्यांना बंदी केल्याने त्या देशाच्या व्यापारावर अनेक बंधने ट्रम्पच्या राजवटीत लादली गेलेली आहेत. त्यामुळे त्या देशामध्ये असंतोष आहे, महागाई पसरली आहे.
उद्या जगातील बलाढ्य देशांनी असेच केले तर काहीही घडू शकते. चीन उद्या तैवान मध्ये असेच आक्रमण करून त्यावर कब्जा करू शकतो. रशिया युक्रेनच्या अध्यक्षाला पकडून नेऊ शकतो. जगात दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या युनोला आता कवडीचीही किंमत उरलेली दिसत नाही. सध्या जगात अमेरिका बळी आहे आणि बळी तो कान पिळी, असा त्याचा ट्रम्पशाहीतील खाक्या आहे. जग काय म्हणेल याची चिंता जगाने करावी, आम्ही जे आम्हाला वाट्टेल ते करू शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प याला वाटते. जोपर्यंत अमेरिकेत ट्रम्प आहे, तोपर्यंत तिथे अशाच प्रकारच्या डाकूगिरीची, मनमानीची आणि दादागिरीची हुकूमत चालणार आहे.
संपादक/ संस्थापक
श्रीकृष्ण चांडक
दैनिक महासागर



