इर्शाळवाडीवर दरड कोसळून १३ ठार!

रायगड, दि.२०। प्रतिनिधी कोकणात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. जोरदार पावसामुळे रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर डोंगराचा काही भाग कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून ७५ जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर, आतापर्यंत १२ जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी ६० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहोचले आहेत. ते सकाळपासून इर्शाळवाडीच्या पायथ्याशी असून बचावकार्यावर नजर ठेवून आहेत. खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून ६ किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.

इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील परिस्थितीचा आणि चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आतापर्यंत १०३ लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले असून १२ जणांचा मृत्यू झाला. काही नागरिक भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही मुले आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेऊन घेतला जात असल्याचे सांगितले. दरम्यान, या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी ५० कंटेंनरची व्यवस्था करण्यात येणार असून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल असे स्पष्ट केले. अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी वसलेली असल्याने आणि मदतीसाठी कोणीतही साधने आणता येणे शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य होत आहे. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू असून इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस असूनही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *