खरी खरी संपादकीय

अंगलट आलेली लढाई

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करून अमेरिकेवर आपत्ती ओढवून घेतली आहे. अमेरिकेत हे युद्ध अमेरिकेचे नाही, तर ट्रम्प यांचे आहे असे म्हटले जाते. ट्रम्प यांचे जे काही चेलेचपाटे आहेत ते म्हणतात की हे युद्ध अमेरिकेचे नाही आणि ट्रम्प यांचेही नाही, तर ते नेतान्याहूचे आहे. अमेरिकेच्या सेनापतीने काही दिवसांपूर्वीच या बावळट ट्रम्पला हल्ला करू नये असा सल्ला दिला होता. परंतु स्वतःला महाज्ञानी समजणाऱ्या ट्रम्पने तो धुडकावला आणि इराणवर आक्रमण केले. इराण हे काही लहानसे इटकले-पिटकले राष्ट्र नाही. इराणजवळ तेलाचे फार मोठे साठे आहेत.

रशियाधिपती पुतीन यांनी युक्रेनला चार दिवसांत जिंकून दाखवू अशी वल्गना केली होती. पण आता चार वर्षे पूर्ण झाल्यावरही रशियाला युक्रेनचा २० टक्के भागही काबीज करता आलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये शहाण्या माणसाने या परिस्थितीचा अभ्यास करून मगच युद्धाचा निर्णय घेतला असता. पण “आपण जगातील सर्वोत्तम देश, आपण जगातील सर्वाधिक श्रीमंत देश, आपण जगातील सगळ्यात मोठा शस्त्रास्त्र सज्ज असा देश आहोत” या गुर्मीतून सर्वांचे सल्ले धुडकावून ट्रम्पने आपली मनमानी केली.

अमेरिकेतील सिनेटर्सच्या बैठकीत आज अमेरिकेच्या हल्ल्याला पाठिंबा देण्यात आलेला नाही, ही फार मोठी घटना आहे. अनेक सिनेटर्स म्हणजेच संसद सदस्यांनी या गोष्टीला घोर विरोध केला आहे. इराणसारख्या मोठ्या देशावर त्यांच्या सर्वोच्च नेत्याला संपवून आपण आपल्याला सहकार्य करणारी राजवट आणू, असे मनाचे मांडे ज्या पद्धतीने ट्रम्प खात होते; त्यासोबतच सर्वोच्च पदावरील तीन डझन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा संहार करूनही इराण आजही ठामपणे उभा आहे.

अमेरिकेच्या तुलनेत इराणजवळ असलेले ड्रोन आणि मिसाईल्स तेवढे घातक नाहीत. गेल्या चार दिवसांत इराणने सौदी अरेबिया, कुवेत, अबुधाबी, तेहरान आणि दुबईपासून बऱ्याच जवळपास असलेल्या गल्फ कंट्रीजमधील अमेरिकेच्या तळांना जबरदस्त मारा करून उद्ध्वस्त करून टाकलेले आहे. तीच स्थिती इतर तळांचीही आहे. खाडी देशांतून अमेरिकेला अब्जावधी डॉलरचा फायदा होतो, त्यामुळे या लहान लहान देशांत समृद्धी असली तरी त्यांच्याजवळ सैन्य नाही, यासाठी हे सर्व देश आज अमेरिकेवर अवलंबून आहेत.

पण आता या सर्व देशांचे डोळे उघडलेले आहेत. इराणनेही या सर्व देशांतील केवळ अमेरिकन तळांवरच हल्ले केलेले आहेत किंवा अमेरिकेच्या व्यापार केंद्रांवर हल्ले केलेले आहेत. तेथील जनतेला जराही झळ लागलेली नाही, त्यामुळे काही गोष्टी या देशांच्या लक्षात आलेल्या आहेत. ब्रिटन, फ्रान्स, स्पेन वगैरे देशांनी आपले तळ अमेरिकेला यापूर्वी वापरू दिले होते, त्याचेही इराणने भयंकर नुकसान करून टाकलेले आहे. इराणजवळ अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता नाही, पण अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करून इराणने जबरदस्त प्रत्युत्तर दिलेले आहे.

ट्रम्प म्हणतात की इराणी सरकार आमच्याबरोबर बोलणी करायला तळमळत आहे. परंतु, इराणच्या नेत्यांनी स्पष्टपणे घोषणा केलेली आहे की आम्हाला अमेरिकेबरोबर बोलायचेच नाही. असे म्हणतात की इराणने आतापर्यंत त्यांच्याजवळ असलेल्या अस्त्रांपैकी केवळ एक टक्का अस्त्रांचाच उपयोग केलेला आहे. याचाच अर्थ गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची मिसाईल्स आणि ड्रोन निर्मिती सुरू आहे. इराणचे ड्रोन किंवा मिसाईल्स पंधरा ते वीस लाखांमध्ये तयार होतात. अमेरिकेला ह्या रकमेच्या शंभर पटीने जास्त खर्च येतो.

आता इराणने हॉर्मुझ येथून तेल वाहून नेणाऱ्या जहाजांची नाकेबंदी केलेली आहे. तिथेही ट्रम्पने फशारकी मारली आणि आपण हा मार्ग खुला करू, त्यासाठी सुरक्षा देऊ अशी शेखी मिरवलेली आहे. या अडकलेल्या जहाजांचा विमा काढला आणि जर इराणने नाश केला, तर त्याचा मोबदला द्यावा असेही जाहीर केलेले आहे. मात्र त्यासाठी कोणतीही विमा कंपनी हात जाळून घ्यायला तयार नाही. ज्या ठिकाणी सहा लाख डॉलर्सचे तेल असलेली जहाजे थांबलेली आहेत, त्यात भारताचाही समावेश आहे. अशी एकूण परिस्थिती असताना अमेरिकेत आता मध्यावधी निवडणुका येत आहेत. या निवडणुकीत ट्रम्पच्या पक्षाला फटका बसू शकतो आणि मग आपोआपच ट्रम्पचे पंख छाटले जाऊ शकतात असा एकूण रागरंग आहे.

आता हे युद्ध ट्रम्पच्या अंगलट आलेले आहे. कितीही बढाया मारल्या तरी इराणचा पराभव करता येत नाही हे ट्रम्पलाही कळून चुकलेले आहे. पण “पडलो तरी माझी टांग वरच” असे ट्रम्प म्हणतो. जगाला आता या युद्धाच्या ज्वाळा किती आणि कसे नुकसान देतात हे पाहायचे आहे. ते पाहताना ट्रम्पला शिक्षा देतच या सगळ्या गोष्टी आपल्यासह सर्व जगाला पाहायच्या आहेत, सध्या इतकंच आपल्या हाती आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *