अर्थ

सेन्सेक्समध्ये ११०० अंकांची घसरण

मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आणि दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल निशाणावर बंद झाले. सेन्सेक्समध्ये ११२३ अंकांची घसरण झाली, तर निफ्टीमध्ये ३८५ अंकांची घट नोंदवली गेली.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध शमण्याचे कोणतेही संकेत न दिसल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा परिणाम बाजारावर झाला. बुधवारी सेन्सेक्सने ७८,५२८ या पातळीवर सुरुवात केली आणि दिवसअखेर १.४० टक्क्यांच्या घसरणीसह ७९,११६ या पातळीवर बंद झाला. निफ्टी ५० ने २४,३८८ या पातळीवर ओपनिंग दिली आणि १.५५ टक्क्यांच्या घसरणीसह २४,४८० या पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदारांना मोठा फटका
या एकाच सत्रात गुंतवणूकदारांचे सुमारे १० लाख कोटी रुपये बुडाले. कारण, बीएसईवर (BSE) सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप मागील सत्रातील ४५७ लाख कोटी रुपयांवरून घटून ४४७ लाख कोटी रुपयांवर आले.

युद्धाचा भडका आणि जागतिक तणाव
इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यानंतर पश्चिम आशियात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागण्याच्या घटना वाढल्या आहेत. इस्रायलने मंगळवारी तेहरान आणि बैरुत (लेबनॉनची राजधानी) येथे नवे हल्ले केल्याचा दावा केला.

रुपयाची ऐतिहासिक घसरण
दरम्यान, बुधवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ६८ पैशांनी घसरून ९२.१५ वर बंद झाला. डॉलर निर्देशांक अनेक महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे महागाई वाढण्याची भीती गुंतवणूकदारांना सतावत आहे. रुपया कमकुवत झाल्याचा अर्थ डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाचे मूल्य घटणे होय. यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसा काढू शकतात, तसेच आयातीवर अवलंबून असलेल्या भारतीय कंपन्यांच्या खर्चात वाढ होऊन त्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *