अर्थ

सलग दुसऱ्या दिवशी बाजारात मंदी सेन्सेक्समध्ये ३७६ अंकांची घसरण

मुंबई, दि. ६ प्रतिनिधी मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीचा सिलसिला कायम राहिला असून बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल निशाणावर बंद झाले. गुंतवणूकदारांकडून नफा वसुली (प्रॉफिट बुकिंग) झाल्यामुळे ही घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये ३७६ अंकांची घसरण झाली, तर निफ्टी ७२ अंकांनी घसरला.

मंगळवारी सेन्सेक्सने ८५,३३१ या पातळीवर सुरुवात केली आणि दिवसअखेरीस ०.४४ टक्के घसरणीसह ८५,०६३ या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी ५० ने २६,१८९ या पातळीवर ओपनिंग दिली आणि दिवसअखेरीस ०.२८ टक्के घसरणीसह २६,१७५ या पातळीवर बंद झाला. बेंचमार्क निर्देशांकांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांची कामगिरी काहीशी कमकुवत राहिली. बीएसई मिडकॅपमध्ये ०.२४ टक्के, तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.३८ टक्के घसरण नोंदवली गेली.

निफ्टी ५० मधील कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ अपोलो हॉस्पिटल्समध्ये दिसून आली, त्यात ३.७५ टक्के वाढ झाली. त्यानंतर आयसीआयसीआय बँक २.९० टक्के, एचडीएफसी लाइफ २.४५ टक्के, टाटा कंज्युमर २.४० टक्के आणि सन फार्मामध्ये १.८२ टक्के वाढ नोंदवली गेली.

दुसरीकडे, निफ्टी ५० मधील कंपन्यांमध्ये टाटा स्टीलला सर्वाधिक फटका बसला असून त्यात ८.६३ टक्के घसरण झाली. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ४.४७ टक्के, आयटीसीमध्ये २.०८ टक्के, कोटक बँकेत २.०४ टक्के आणि इंटरग्लोबमध्ये १.९६ टक्के घसरण पाहायला मिळाली.

सेक्टरल निर्देशांकांमध्ये निफ्टी फार्ममध्ये १.६९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. निफ्टी ग्रोथ सेक्टरमध्ये ०.९८ टक्क्यांची तेजी दिसून आली, तर निफ्टी पीएसयू बँकमध्ये ०.५९ टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी आयटी निर्देशांक ०.५५ टक्क्यांनी वधारला असून निफ्टी कॅपिटल मार्केटमध्ये ०.४१ टक्क्यांची तेजी नोंदवली गेली. निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये ०.३४ टक्के, निफ्टी मेटलमध्ये ०.२९ टक्के, निफ्टी एफएमसीजीमध्ये ०.२३ टक्के तर निफ्टी बँकमध्ये ०.१२ टक्क्यांची वाढ झाली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *