आज एक विशेष अहवाल आमच्या वाचनात आला. मान्सूनपूर्व कापसाच्या बियाण्याची लागवड केल्यावर शेतकऱ्यांना तीन ते साडेतीन क्विंटल कापसाचे उत्पन्न मिळालेले आहे. मान्सून पूर्व लागवडीचा खर्च जास्त असतो कारण त्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे लागते आणि त्यासाठीही बराच खर्च येतो. मान्सूनपूर्व पद्धतीने पेरणी केल्यावर शेतकऱ्याला मजुरी सोडून एकराला कमीत कमी 18 ते 20 हजार रुपये खर्च येत असतो.
सध्याच्या घडीला कापसाला सहा ते सात हजारच्या दरम्यान भाव मिळतो. तो कापूस विकल्यावर शेतकऱ्याच्या हातात साधारणपणे वीस ते बावीस हजार रुपये येतात. आम्ही वर जो उल्लेख केलेला आहे त्या खर्चात शेतमालकाची आणि त्याच्या कुटुंबाची मजुरी याचा समावेश केलेला नाही. त्याचा समावेश केला तर किमान पाच ते सहा हजार अजून खर्च म्हणजे ज्यादा खर्च गृहीत धरावा लागेल. याचा अर्थ शेतकऱ्याला एका एकराचा लागवड खर्च जवळपास 25 हजार रुपये येतो म्हणजे मोठ्या प्रमाणावर विक्रीची किंमत पकडली तरी शेतकऱ्याची जेमतेम मजुरी निघते, त्याला नफा होत नाही. जागतिक पातळीवर कापसाचे भाव गेल्या तीन-चार वर्षापासून आपटलेलेच आहेत.
कापूस, सोयाबीन, गहू किंवा हरभरा यांचेही भाव शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारे नाहीत. कापूस महाराष्ट्रात नगदी पैसा देणारे पीक आहे पण एकूण जागतिक परिस्थिती समोर शेतकरी हतबल आहे कारण कोणत्याही पिकाची शाश्वती नाही. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये वाईट हवामानामुळे शेतकऱ्यांना कापसाचे अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. नेमकी हीच परिस्थिती इतर अनेक पिकांची आहे. त्यातच कडधान्यांचे भावही अजिबात समाधानकारक नाहीत, अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील आधीच असलेला कर्जाचा बोजा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. वर उल्लेख केलेली पिके शेतकऱ्यांना एकेकाळी चांगला फायदा देणारी होती. मात्र मागील काही वर्षात अनेक भागातील संत्रा आणि मोसंबीच्या बागांनाही अपेक्षित असा मोहर येत नाही.
भाजीपाल्याच्या उत्पन्नाचीही शाश्वती नसते म्हणजे एकूणच शेतकऱ्यांच्या खर्चाचे गणित ठरलेले असते. परंतु उत्पादन निघून किती पैसे हाती येतील याबाबतची माहिती खरोखर शेतकऱ्यांना नसतेच. शेतकऱ्यांना एखाद्या वर्षी एखाद्या पिकाचा चांगला भाव मिळतो गेल्या काही वर्षांपूर्वी तुरीला चांगला भाव मिळत होता पण आता तुरीलाही रोग आलेला दिसतो. त्यामुळेच सध्या कोणती लागवड करावी हे अनेक शेतकऱ्यांना समजेनासे झालेले आहे. एकाही पिकाची हमखास पैसे मिळवून देणारी म्हणजेच नफ्याची शाश्वतीच नाही. सरकारने तर अनेक वेळा कर्जमाफी केलेली आहे, सध्या तुरीवरही एका खतरनाक रोगाने हल्ला केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमखास नफा मिळवून देणारे पीक हातचे गेलेले आहे. त्यातच अमेरिकेने आपला शेतमाल भारतात विकत घ्यावा म्हणून दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केलेली आहे.
अशा एकूण विचित्र परिस्थितीच्या वातावरणात शेतकऱ्यांनी कुठे जावे, काय करावे आणि कसे जगावे की मरूनच जावे हेच कळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल सरकारला काहीतरी निर्णय खंबीरपणे घेणे गरजेचे झालेले आहे. थोडक्यात अलीकडची वर्षे म्हणजे शेतकऱ्यांचे मातीपर्व आहे असे म्हटल्यास ही अतिशयोक्ती ठरू नये. सरकारने याची गंभीर दखल घेतलीच पाहिजे.



