खरी खरी संपादकीय

देवाभाऊंचा मोठेपणा

महाराष्ट्राचे तरुण तुर्क आणि तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उर्फ देवाभाऊ यांनी अगदी देवाच्या तोंडात शोभेल असे विधान केलेले आहे. त्यांनी तसे विधान करून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलेच पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष परवा लातूरला गेले होते. एखाद्या शहरात आपल्या पक्षाचा अध्यक्ष आला आणि तो पहिल्यांदा आला तर त्याच्या आगमनाचे जंगी स्वागत केले जाते. त्यासाठी फार मोठा समारंभ होतो कार्यकर्त्यांना हुरुप येतो आणि मग पक्षाचे सर्वाधिकारी बनल्यावर कधीकधी समोरच्या श्रोत्यांचा हुरूप आणि उत्साह पाहून एखादा वेडावाकडा शब्द चुकून बाहेर पडतो. आजकाल वेड्यावाकड्या शब्दांनाही सरळ करण्याची जादुई किमया अनेकजण करतात मात्र, बरेचदा त्या उलटही होते.

रवींद्र चव्हाण यांनी बोलण्याच्या ओघात लातूर मधून आता विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे विधान केले होते. समोरच्या कार्यकर्त्यांचा हुरूप पाहून अति उत्साहाच्या भरात ते बोलून गेले असतील. परंतु विलासराव देशमुख यांच्या पक्ष विरहित मैत्रीचा धागा सर्व पक्षांना बांधून ठेवणारा होता. विलासरावांची हृदयाला भिडणारी भाषणे, त्यांचा प्रसन्न आणि हसतमुख चेहरा त्यांची सभा जिंकण्याची हातोटी तसेच सर्व पक्षातील त्यांचे मैत्रीचे बंध महाराष्ट्राला चिरपरिचित आहेत. तसे पाहिले तर विलासराव राजकारणातील ऐन तारुण्यात या पृथ्वीतलावरून गेले. त्या काळात विरोधी पक्षात असलेल्या गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव यांचा तात्विक विरोध कितीही असला तरीही ते दोघे पक्के जिवाभावाचे मित्र होते, ही बाब देवेंद्र फडणवीस उर्फ आपले देवाभाऊ यांना चांगलीच ठाऊक आहे.

विलासरावांबद्दल लातूरच्या जनतेला किती जिव्हाळा वाटतो, त्यांच्यावर तळागाळातील जनतेपासून ते मोठमोठ्या अनेक व्यक्तींचा किती विश्वास आणि प्रेम होते आणि आजही टिकून आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्ही कधीही फोन करा स्वतः फोन उचलून बोलणारा मुख्यमंत्री म्हणून विलासराव प्रख्यात होते. कितीही गंभीर विषय असला तरी त्याचे निवारण करण्यासाठी विलासराव सदैव तत्पर असत. आपले सध्याचे मुख्यमंत्री त्यांच्या विरोधी पक्षातील आहेत पण देवेंद्रजींनी ज्या शब्दांमध्ये विलासरावांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन केलेले आहे ते निश्चितच देवेंद्रजी यांचा स्वभाव आणि त्यांच्या सध्याच्या निवडणुकीतील पदाला साजेसेच आहे. सध्या महापालिकांच्या निवडणुकीचे दिवस आहेत. अशा वेळी कोणतीही विधाने करताना अतिशय सावधानता बाळगली पाहिजे.

रवींद्र चव्हाण यांनीही एकूण परिस्थिती पाहून दिलगिरी व्यक्त केलेली आहे, ‘ते मोठे नेते होते विलासराव मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांचे काम खूपच चांगले होते’ असे सांगून रवींद्र चव्हाण यांनी आपले शब्द जवळजवळ मागे घेतलेले आहेत आणि विलासरावांची स्तुती सुद्धा केलेली आहे. अशावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी जी भूमिका घेतलेली आहे, ती निश्चितच मनाचा मोठेपणा दाखवणारी आहे हे खरे आहे. महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा वेगळ्या वळणावर जाऊ नये म्हणून देवेंद्रजींनी तत्काळ वक्तव्य करून ज्या पद्धतीने दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळेच विलासरवांच्या चाहतांची नाराजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही सावरण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. पक्षापक्षांत विचारांची लढाई असली तरी कोणत्याही पक्षाचा नेता राज्याला विकासाच्या पक्षाकडेच घेऊन जाईल यात शंका असण्याचे कारण नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्षानेही आता या विधानाचे भांडवल न करता मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही या वादावर पडदा टाकून चांगलेच काम केले आहे, असेच म्हणावे लागेल.

-श्रीकृष्ण चांडक 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *