खरी खरी संपादकीय

काँग्रेसचा चंद्रपूरचा तिढा

काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्रामधील चंद्रपुरातील नगरपालिकेत सत्ता स्थापनेचा क्षण अगदी जवळ आला होता. मात्र सत्ता काँग्रेस पक्षाला बहुतेक शनीचा फेरा सुरू आहे कारण हाती आलेल्या यशाला कसे लाथाडावे हे शिकायचे असेल तर त्यांनी काँग्रेस पक्षातील सत्तासंघर्षाचा किंवा सुंदोपसुंदीचा अभ्यास करावा. यापूर्वी हाती आलेली मध्यप्रदेशची सत्ता काँग्रेसने याच गोष्टीमुळे गमावली. त्यापूर्वी गोव्याचेही तेच झाले, कर्नाटकातही नाटकच झाले. एकूणच हातात घेतलेला घास तोंडात टाकण्यापेक्षा शेंबूड भरलेल्या नाकात टाकल्यामुळे घास तर नासून गेलाच पण शेंबूडही नासला.

चंद्रपूर महानगरपालिकेत ६६ नगरसेवक निवडायचे होते. चंद्रपुरातील भाजपच्या भांडणामुळे काँग्रेसचे फावले यामुळे काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले. पाच नगरसेवक वंचितचे आणि तीन नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत. यांची बेरीज करून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना हर्षवायू झाला होता. या आनंदाच्या कृतिकरणात वडेट्टीवार यांचा आत्मविश्वास जनतेला दिसून आला होताच.

चंद्रपूरच्या राजकारणात जसे भाजपचे दोन परस्पर विरोधी गट आहेत तीच स्थिती काँग्रेसची आहे. एक गट खासदार बाईंचा दुसरा गट आमदार भाईंचा आहे. अशा परिस्थितीमुळे निकाल लागल्यावर दोन-चार दिवसात काँग्रेसच्या या दोन गटात लठ्ठालठ्ठी सुरू झाली. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केली आणि एका गटाला महापौरपद तर दुसऱ्या गटाला स्थायी समिती हा आदर्श त्यांच्याकडून देण्यात आला. आता मित्र पक्षाच्या सहाय्याने आपली सत्ता येणार असे मनाचे मनोरे बांधण्यात आले.

तेवढ्यात तीन सदस्य असलेल्या उबाठाला अडीच वर्षे महापौर पदाचे डोहाळ लागले त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चिघळले. काँग्रेसच्या दोन गटांचे भांडण किती विकोपाला जावे? काल नागपूरहून चंद्रपूरला जात असलेल्या एका गटाच्या नगरसेवकांना दुसऱ्या गटाकडून धमक्या मिळाल्या, अपहरणाचा प्रयत्न झाला. यामधील काही लोकांच्या तोंडावर दुपट्टा बांधल्याची चित्रफीत सर्वत्र प्रदर्शित झालेली आहे. प्रकरण पोलिसातही गेले म्हणजेच, हे दोन गट एका दगडावर दोन्ही बाजूने डोकं आपटत आपटत आपले डोकं वापरण्याजोगे नाहीच असे समजून ते फोडायला लागलेले दिसून येत आहेत.

एकाच पक्षात राहून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आदर्श देऊनही कोणाचेच काहीही ऐकायचे नाही असा निर्धार करून जो तमाशा चंद्रपूरच्या काँग्रेसजनांनी केला त्याला अजिबात तोड नाही. या दोन्ही गटाचे प्रेरक एकेकाळी शिवसेनेचे पदाधिकारी होते म्हणजे या दोन्ही गटाचे प्रमुख मूळचे काँग्रेसजन नाहीत. काँग्रेसच्या हातात असलेली सत्ता या परस्पर विरोधातील उपद्व्यापामुळे आयतीच भारतीय जनता पक्षाच्या हाती जाऊ शकते. एवढे साधे गणितही या काँग्रेसजनांना कळत नाही.

यावरून हे काँग्रेसजन नसून काँग्रेस गवतासारखे आहेत असे म्हणावेसे वाटते. कारण अमेरिकेतून आलेल्या मिलोच्या बिया या जमिनीला आणि उंदरा पिकांना दूषित करीत होत्या. त्यामुळे त्या मिलोच्या बिया उगवल्यावर लोकांनी त्याचे नाव काँग्रेस गवत असे ठेवले होते. त्यावेळी काँग्रेसची सत्ता असल्यामुळे त्याला गाजर गवत असे नामकरण मिळाले. ते विषारी गाजर गवत पिकासाठी जसे घातक असायचे, तोच प्रकार चंद्रपूरच्या उपजाऊ भूमीमध्ये काँग्रेस जणांच्या बाबतीत सार्थ ठरेल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकाच पक्षात राहून परस्परांना कसे हरवावे, याचा चंद्रपूरचा तिढा हा असा आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *