आज बांगलादेशच्या निवडणुकीचे निकाल लागले. तिकडे मतदान संपले आणि इकडे मतमोजणी सुरू झाली. असाच प्रकार इंग्लंडमध्येही होतो. मतदान झाल्यावर महिना-महिनाभर वाट पाहायला लावणारी आपली भारतातील मतमोजणीची प्रक्रिया अनेक प्रश्न निर्माण करते.
बांगलादेशच्या निवडणूक निकालाचे विश्लेषण करताना अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बेगम खालिदा झिया आणि बेगम शेख हसीना यांच्यापैकी एका कुटुंबाच्या हातात सत्तेची घेवाण-देवाण होत असते. यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे. बांगलादेशातील तरुणाई म्हणजेच ‘जेन-झी’ने (Gen-Z) बेगम शेख हसीना यांच्याविरुद्ध जबरदस्त आंदोलन उभे केल्यामुळे शेख हसीना यांना आपला देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर बांगलादेशची सत्ता तेथील बँकर मोहम्मद युनूस यांच्याकडे आली.
तसे पाहिले तर बांगलादेशच्या निवडणुका अजून लवकर व्हायला पाहिजे होत्या, पण या ना त्या कारणामुळे तेथील सत्ताधीशांनी बरेच महिने सत्ता उपभोगलेली आहे. या सत्ताधीशाने म्हणजेच मोहम्मद युनूसने भारताविरुद्ध जणू काही युद्धच पुकारले होते. बांगलादेशातील जिहादी, पाकिस्तानवादी आणि भारताच्या छुप्या शत्रूंनी एक आघाडीच उघडली होती. गेल्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये बेगम हसीना यांनी गडबड करून सत्ता मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तेव्हा बेगम खालिदा झिया आजारी होत्या. आज ज्या परिस्थितीमध्ये बेगम हसीना आहेत, तशाच अवस्थेत त्या होत्या.
आता खालिदा पुत्राच्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे. कट्टरतावादी पक्षाने थोड्याफार जागा जिंकलेल्या आहेत, पण सत्ता बेगम खालिदा झिया यांच्या पुत्राच्या हाती राहील असे निकालावरून स्पष्ट दिसते. या पक्षाला भारताशी वैर घेणे परवडणारे नाही, हे या पक्षाला समजण्याचे वय आहे. त्यामुळे शेख हसीना इतके नसले तरी, भारताबरोबर थोड्याफार सलोख्याचे संबंध ठेवण्याचा त्यांचा इरादा नक्कीच असेल.
बांगलादेशच्या निर्मितीसाठी भारताने जी मदत केलेली आहे, ती या देशातील कुणालाही विसरता येणार नाही. पण त्यानंतर आता तिसऱ्या पिढीच्या हाती सत्ता आलेली आहे. ती पिढी भावनिक दृष्ट्या विचार करत नाही, तर ती व्यावहारिक दृष्ट्या विचार करते. बांगलादेशात तिथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर जीवघेणे हल्ले होत आहेत. यावर नव्या सरकारला गंभीरपणे विचार करून ते हल्ले थांबवावे लागतील.
आज बांगलादेशात अनेक बाबतीत हाहाकार सुरू आहे, त्यामुळे नव्या सरकारला कितीतरी गोष्टींमध्ये व्यावहारिक निर्णय घेणे गरजेचे ठरेल. भारतातील अवैध बांगलादेशींची संख्या बरीच मोठी आहे. त्यांना भारतात खोट्या नावाने राहावे लागते, खरं तर त्यांची हकालपट्टीही होऊ शकते. तेव्हा बांगलादेशाला आपल्या नागरिकांबाबत सकारात्मक विचार करावाच लागेल.
सध्या तरुणांच्या डोक्यात धर्मद्वेषाचे विष भरणे चालू आहे, मात्र आता नव्या सरकारला अशा प्रवृत्ती ठेचून काढाव्या लागतील. हे चालू देणे त्यांना परवडणार नाही. गेल्या वर्षीच्या उलथापालथीमुळे बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो बांगलादेशातील हिंदू जनतेचा. त्यासाठी तेथील सरकारला कडक धोरण स्वीकारावे लागेल.
आता पुढील पाच वर्षे तरी शेख हसीना सत्तेवर येतील असे दिसत नाही. त्यांच्या पक्षावर अंतरिम पक्षाने बंदी आणली होती. यामुळे शेख हसीना यांच्या पक्षातील बडे नेते सैरभैर झालेले दिसतात. आता वातावरण निर्मिती करून विद्वेषाला बंद करावे लागेल. हे काम वाटते तितके प्रत्यक्षात सोपे नाही. त्यासाठी कठोर नियम करून देशात परस्पर प्रेमाचे वातावरण निर्माण करावे लागेल. नव्या सरकारसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहणार आहेत, त्यांचा निकाल लावणे सुद्धा कर्मकठीण गोष्ट आहे. देशातील जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवणे ही बांगलादेशातील सरकारची प्राथमिक जबाबदारी असेल. तरीही आपण बांगलादेशात शांतता परंपरा निर्माण होईल, अशी आशा करूया!



