गतवर्षी १२ वाजून एक मिनिटांनी २०२५ची सुरुवात झाली. डिसेंबरचा शेवटचा क्षण आणि जानेवारी एकचा पहिला क्षण या दोघांच्या मिलनाला आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणतो. पाश्चात्य लोक नव्या दिवसाची सुरुवात रात्री बारा वाजता करतात, म्हणजे ते अंधाराकडून उजेडाकडे जातात आपण उजेडाकडून व्हाया अंधार ते पुन्हाउजेडाकडे येतो. अंधार म्हणजे काटेकुटे, खाचखळगे आणि ओबड धोबडपणाचा रस्ता अशी संकल्पना आहे. पण नव्या प्रभातीच्या आशेने आपण नवीन वर्षाचे स्वागत करतो. आपले नवीन वर्ष खरे म्हटलं तर गुढीपाडव्याला सुरू होते.
गुढीपाडवा ते गुढीपाडवा संवत्सर म्हणजे आपले वर्ष आहे. बरं आपल्या वर्षात कधीकधी १३ महिनेही असतात ते जाऊ द्या. सध्या आपण तसेही ५०% इंग्रजाळलेलोच आहोत. मराठीच्या शाळा ओस पडत आहेत. आज-काल बहुतेक मुलांच्या आया आपल्या बाळाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करत आहेत. या भव्य भव्य इमारतींच्या शाळा पाहिल्यावर डोळे दिपून जातात. त्यांचा शिक्षणासाठीचा खर्च ज्याला आपण फी म्हणतो तो वर्षाला सहा आकड्यांमध्ये असतो. कोणे एकेकाळी या देशांमध्ये सामान्यांसाठी शिक्षण मोफत होते, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वीच्या काळी गरीब आणि श्रीमंत एकाच वर्गात आणि एकाच शाळेत शिकत असत. तेव्हा महिन्याला चार ते आठ आणे देणारा श्रीमंत समजला जाई. त्यावेळी शिक्षणात तरी कुठलाही भेदभाव नव्हता कारण त्याकाळी शिक्षक तळमळीने शिकवित असत.
संपूर्ण अभ्यासक्रम ज्याला हल्ली आपण सिलॅबस म्हणतो तो अपूर्ण राहिला असेल. तर तेव्हाचे शिक्षक शाळा सुटल्यावरही आपला ज्यादा वेळ देऊन विद्यार्थ्यांना शिकवणे, हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून शिकवीत असत. तेव्हाचे शिक्षक हे गुरुजी होते ते सरस्वतीचे उपासक होते, काही तसेच चांगले अपवाद सोडून आत्ताचे शिक्षक | लक्ष्मी देवीची आराधना करतात. शाळेत भरमसाठ पगार मिळत असला तरी काही अपवाद सोडता सरकारी शाळा आता शिक्षणाचे केंद्र आहे असे वाटत नाही. हल्ली शिक्षकांनाही विविध कामे दिली जातात त्यामध्ये आपल्या गावात किती कुत्रे आहेत यांची गणती करण्याचे कामही दिल्याचे आम्ही ऐकलेले आहे.
मतदानासाठी नाव नोंदणी करणे, गणना करणे वगैरे सारखी कितीतरी कामे सरकारी शाळांच्या शिक्षकांना करावी लागतात. खाजगी शाळांची परिस्थिती वेगळी आहे, शिक्षणाच्या नियमित राशी शिवाय इमारतीच्या बांधकामा पासून स्वच्छतागृहापर्यंत आणि | विविध सामाजिक उपक्रमांच्या नावाने वर्षभर वसुली चालूच असते. खरे पाहिले तर प्राथमिक शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे पण आपली सर्व सरकारे याबाबतीत डोळे उघडे ठेवून झोपलेली दिसतात. त्यांचे कानही त्यांना जे ऐकायचे असते तेवढेच ऐकतात. आपले हे वर्ष तर संपले, संपणारे वर्ष आणि नवीन वर्ष यांच्या संधी काळात मोठ्या प्रमाणावर मानसिक सौख्यासाठी रात्रभर भिन्नभिन्न प्रकारचा उत्सव सुरू असतो.
या उत्सवाच्या सुवासाने अनेक घटना आणि दुर्घटनाही घडतात पण आजच्या शुभ संधी काळात त्याची चर्चा न करता चांगल्याची चर्चा करूया. ‘जुने जाउद्या मरणा लागूनि’ असे न म्हणता ‘जुने ठेवूया स्मरणासाठी, नववर्षात शुभ वर्तमानाच्या बांधू गाठी’ इतकेच आपण म्हणूया. पुढील वर्षी नवनवीन शोधांद्वारे नव्यानव्या संधी प्रकाशात भाग्योदयाची नवी संधी शोधूया आणि इंग्रजाळलेल्या नववर्षाचे स्वागत करूया




