खरी खरी संपादकीय

किडनीतील काटे आणि कंगोरे

चंद्रपूर जिल्ह्यातील ३६ वर्षीय पीडित शेतकरी रोशन कडू यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेले वक्तव्य अतिशय गंभीर आहे. हे प्रकरण शेतकऱ्याची किडनी काढण्यापुरते मर्यादित नाही; कर्जपायी या गरीब शेतकऱ्याने आपली किडनी विकली. हे सत्य असले तरी, अशा लोकांना शोधून त्यांच्या किडनीचा व्यापार करणारे आंतरराष्ट्रीय षडयंत्र एवढे मोठे असेल असे कोणालाच वाटले नव्हते.

खरं पाहायला गेले तर हे ‘एका मुंगीचे महाभारत’ आहे असेच दिसते. हे प्रकरण वाटते तेवढे साधे सोपे नाही, कारण एकापेक्षा एक असे अनेक गुंतागुंतीचे खुलासे दररोज करण्यात येत आहेत. आजच्या खुलाशामध्ये या शेतकऱ्याने त्याच्यावर एका मोठ्या राजकीय नेत्याकडून प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप केला आहे. जर त्याच्यावर एखाद्या राजकीय नेत्यांने प्रचंड दबाव आणला ही गोष्ट खरी असेल, तर हे प्रकरण फारच गंभीर दिसत आहे.

या शेतकऱ्याजवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरावे कुठून आले हा सुद्धा प्रश्न आहे. याचा अर्थ हा माणूस अत्यंत गंभीर खुलासे करणार आहे. या पीडित शेतकऱ्याची वरवरची माहिती आपण ऐकली आहे, पण आता तो जे खुलासे करणार आहे ते खुलासे त्याला करता येतील की नाही, हाही मोठा सवाल या प्रकरणाच्या निमित्ताने उभा आहे. चंद्रपूर सारख्या जिल्ह्यातील सहा सावकार या प्रकरणात अडकलेले आहेत.

यावरून या सावकारांचे लागेबांधे किती दूरवर पोहोचलेले आहेत आणि केवळ हा माणूस एक पीडित शेतकरी आहे अशा पद्धतीने हे प्रकरण पाहू नये. पत्रकार परिषदेत त्यांनी लवकरच पूर्ण खुलासे करू असे आश्वासन दिले आहे. परंतु या पीडित शेतकऱ्याला ते आश्वासन पूर्ण करता येईल काय, असाही प्रश्न या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उभा राहिलेला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टरला न्यायालयाने जामीन नाकारलेला आहे व तो ही फरार आहे. त्याला शोधणे आणि जेरबंद करणे पोलिसांचे काम आहे.

पण हा शेतकरी जे सांगतो त्यावरून या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय धागेदोरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या या देशातील डॉक्टरांपासून इतर अनेक मोठमोठे लोक हे प्रकरण दडपण्यासाठी काहीही करू शकतात. ज्याअर्थी विरोधी पक्षातील नेत्यासोबत हा शेतकरी पत्रकार परिषद घेतो, त्याअर्थी या शेतकऱ्याला आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागणे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा गौप्यस्फोट होणे गरजेचे वाटते. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी पत्रकारांना बोलावून सांगाव्या लागत आहेत.

आता भविष्यकाळात कोण कोण उघडे पडतील हे पहावेच लागेल. आपली यंत्रणा किती कुजलेली आहे याचेही खुलासे होतील, कारण भारतात जी यंत्रणा आहे ती यंत्रणा किती प्रकारे वाकवता येते, पैशासाठी किती आणि कुठले नियम कसे गुंडाळून ठेवता येतात, याबाबत न बोललेलेच बरे. निश्चितच या सगळ्या गोष्टी देशाची शोभा वाढवणाऱ्या नाहीत. हा पीडित शेतकरी आता व्हीआयपी (VIP) बनलेला दिसतो. एका किडनीचे दान देऊन त्याने किडनीच्या समाजद्रोही व्यापारावर जो हल्ला केला आहे, त्यावरून या व्यक्तीजवळ बऱ्याचशा गोष्टी असतील.

या प्रकरणाचे सर्व धागेदोरे त्याला कुठून कसे मिळाले याचाही शोध घ्यावा लागेल. दुसरा प्रश्न असा आहे की हा माणूस जे खुलासे करणार आहे त्याकडे ते पुरावे कुठून आणि कसे आले तेही त्याला सांगावे लागेल. म्हणजे या प्रकरणाची व्याप्ती अर्थातच फारच व्यापक आहे. आता त्याच्या गौप्यस्फोटापूर्वी आपली सरकारी यंत्रणा जागृत होते काय हेही बघावे लागेल. या प्रकरणातील ‘काटे आणि कंगोरे’ शोधणे हेच मोठे आव्हान आहे. कारण चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात इतके मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान झाले असेल आणि जर या आंतरराष्ट्रीय कटाचा जर परिपूर्ण खुलासा झाला, तर त्या पीडित शेतकऱ्याने राष्ट्रीय कर्तव्यच बजावले असेच म्हणावे लागेल.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *