खरी खरी संपादकीय

सोने-चांदीची व्यथा

तीन दिवसांपूर्वी चार लाखांपर्यंत गेलेली चांदी आज अडीच लाखांच्या दरम्यान आलेली आहे. तीच परिस्थिती सध्या सोन्याचीही आहे. दोन लाखांच्या जवळपास पोहोचलेली प्रतितोळा सोन्याची किंमत आता दीड लाखाच्याही खाली आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात दररोज उलथापालथ होत होती ती अत्यंत चिंताजनक आहे. आपल्या देशात मोठमोठ्या तालेवार घराण्यांपासून अगदी लहानात लहान आणि कमीत कमी उत्पन्न असलेल्या घरात देखील जुन्या-जाणत्या उत्पन्नाच्या प्रमाणात सोने सर्वांच्याच घराची शोभा वाढवत असते. आपल्या देशातील लग्ने सोन्याच्या खरेदीशिवाय पूर्ण होत नसतात. गेल्या काही दिवसांपासून जागतिक परिस्थितीमुळे सोने आणि चांदी यांच्या दराच्या बाबतीत दररोज ज्या उलाढाली होत आहेत त्यावरून भल्याभल्यांची दांडी उडत आहे.

भारतात सरकारजवळ साधारणपणे ८०० टन सोने आहे. त्या तुलनेत अमेरिकेजवळ आठ हजार टन, चीन जवळ ३००० टन आणि इतर श्रीमंत देशांकडेही मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा आहे. आपल्या देशात जेवढे सोने सरकारजवळ आहे त्यापेक्षा दोन ते अडीच पट जास्त सोने नागरिकांजवळ असेल. हे सर्व सोने आता किमतीच्या बाबतीत कसे, किती आणि काय बदल घडतात याचा अभ्यासही मनोरंजक ठरावा.

बदलते प्रमाण आणि व्यवहार: सामान्य माणसासाठी एक तोळा म्हणजे पूर्वी असलेल्या १२ ग्राम सोन्याऐवजी आजच्या काळात हे प्रमाण १० ग्रामवर आलेले आहे. पण आताच्या परिस्थितीत १० ग्रामसाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च करणे श्रीमंत मध्यमवर्गाला देखील शक्य होत नाही. तरीही आपल्या देशातील महानगरांपासून ते छोट्या नगरांपर्यंत आणि छोट्या नगरांपासून ते अगदी गावांपर्यंत सोने-चांदीचे दागिने विकणाऱ्या सराफांची दुकाने गल्लोगल्ली दिसून येतात.

पूर्वीच्या काळी एखाद्या मुलीसाठी लग्नाच्या वेळी मंगळसूत्र तयार करताना एक किंवा दोन तोळे सोन्याची खरेदी होत असे. आता हे मंगळसूत्रही एक किंवा दोन ग्राम सोन्यामध्ये बनवण्यात येते. सध्या ज्या सोन्याच्या किमती आहेत त्यावरून यापुढे एक ग्रामपेक्षाही कमी वजनाचे मंगळसूत्र बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वसामान्य लोकांसाठी लग्नाच्या वेळी सोन्याची खरेदी करण्याच्या विषयापेक्षा फारसा याचा संबंध येईल असे वाटत नाही, मग आपल्या देशातील गल्लोगल्लीत असणारी सोन्या-चांदीची दुकाने दररोज सोन्याचे दागिने तयार करून ते जर विकत नसतील, तर ही दुकानदार मंडळी स्वतःची स्वतःची बिन पाण्याने हजामत तर करून घेणार नाहीत ना, असाही प्रश्न पडतो. म्हणजेच आपल्या समाजातील एक विशिष्ट वर्ग आजही सोने आणि चांदी यांची खरेदी करण्यात अग्रेसर असतो असा याचा सरळ अर्थ आहे. हा वर्ग कोणता आहे याची फोड न करताही आमच्या वाचकांना त्याची कल्पना आलीच असेल, यात अजिबात शंका नाही.

चांदीचे दर: चांदीचे भाव या वर्षभरात किती पटीने वाढावेत यालाही सीमा राहिलेली नाही. काही महिन्यांपूर्वी ५० हजारांच्या आसपास रगाळणारी चांदी आता चार लाख रुपये किलोपर्यंत पोहोचलेली होती. दोनेक वर्षांपूर्वी एखाद्याच्या लग्नात आहेर करताना चांदीचे शिक्के मुक्तपणे देण्यात येत असत. आता सामान्य जनतेला ते देणेही आटोक्याबाहेरचे झालेले आहे. मधल्या काळात तर चांदीची विक्री थांबलीच होती.

यापुढे आपल्याजवळ असलेल्या सोन्या-चांदीची किंमत कधी गगनाला गवसणी घालेल आणि अचानक कधी पाताळात गाडली जाईल हेही समजेनासे झालेले आहे. सोने-चांदीची अशी ही भयकथा यापूर्वी आपण कधीच अनुभवलेली नसेल. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्वजण अनुभवीत आहोत म्हणूनच सोन्यासारख्या शब्दांचा हा प्रपंच आपल्याला निदान वाचून आनंदित होण्यास भाग पाडील यात शंका नाही. सोने आणि चांदी या दोन धातूंची परस्पर होत असलेली व्यथाही आपण अनुभवली पाहिजे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *