नाशिक, दि. ९ प्रतिनिधी:१५ जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा नाशिक हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब ग्राऊंड), शिवाजी नगर येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत उपस्थित होते. दोन दशकांनतर पहिल्यांदा दोन्हीं ठाकरे बंधू निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी एकत्र आले होते. प्रचारसभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला व पूर्ण मैदान खचाखच भरून गेले होते. या सभेत दोन्हीं बंधूंनी आपापल्या शैलीत भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्ले चढवले.
नाशिकला मनसेने कर्जमुक्त केले होते – राज ठाकरे
नाशिकमध्ये आमची सत्ता असताना रतन टाटा यांच्या मदतीने आम्ही बोटॅनिकल गार्डन तयार केले होते. गेल्या पाच वर्षात यांनी त्याची काय अवस्था केली? नाशिकमध्ये आमची सत्ता असताना महापालिकेवर ७०० कोटी कर्ज होते. पुढच्या पाच वर्षात आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली. पाच वर्षात विरोधकांकडूनही कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला नाही. मी कंत्राटदारांची बैठक घेतली होती. तुमच्याकडे जर कुणी पैसे मागितले तर सांगा, पण जर रस्त्यावर खड्डे पडले तर त्या खड्ड्यात उभा करून मारेन असं सांगितले होते. हे होऊ शकते, पण यांना आता करायचे नाही.
नाशिक नियो मेट्रो प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, बाह्य रिंग रोड, आदिवासी क्रीडा प्रबोधिनी असे अनेक प्रकल्प फडणवीसांनी जाहीर केलं. पण एकही काम त्यांनी केले नाही. भाजपने फक्त धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली लोकांना भुलवले. २०१७ साली आमची सत्ता गेली आणि भाजप निवडून आला.
एवढं काम करूनही मला पराभव पाहायला लागला आणि ज्या लोकांनी काहीही केले नाही ते सत्तेत आले. आजही तेच सुरू आहे. पैसे वाटायचे आणि सत्ता मिळवायची हे काम सुरू आहे. आमचा आई-बाप १५०० रुपयांसाठी विकले गेले, विकास झालाच नाही असे जर तुमच्या मुलांनी भविष्यात म्हणू नये असे वाटत असेल तर आम्हाला सत्ता द्या. आज आमच्या पाठिशी उभा राहा, भ्रष्टाचारी भाजपच्या पेकाटात लाथ घाला. हे शहर उत्तम करायचं असेल तर तुम्ही सज्ज व्हा.
पक्ष चालवायला भाजपला बरबटलेली माणसे चालतात- उद्धव ठाकरे
पक्ष चालवायला भाजपला बरबटलेली माणसे चालतात. त्यांना डोक्यावर नाचवताय असे ठाकरे म्हणाले. आम्ही एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले दुसऱ्या दिवशी तेच तिकडे गेले. वाईट निष्ठावान कार्यकर्त्यांचे वाटत आहे. देवयानी ताई यांच्याबाबत मला आदर आहे. त्यांना रडू आले. तुमची निष्ठा ज्या पक्षाशी आहे, तो पक्ष आज उपऱ्यांचा दलालांचा पक्ष झाला आहे. शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाडे नाहीत असे मुनगंटीवार म्हणाले.
भाजपमध्ये चोर दरोडेखोर येतात. राणालासुद्धा भाजपमध्ये घेतील एवढे निर्लज्ज झालेत. भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेससोबत गेलो होते. भाजपने एमआयएमसोबत युती केली आहे, तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेले? असा सवाल ठाकरेंनी केला. ठाकरे बोलतात ते करतात. मशाल तुमच्या हदयात पेटली पाहिजे. राहुल नार्वेकरविधानसभा अध्यक्ष आहे. तो निपक्षपातीपणे काम केलं पाहिजे. भाजप मात्र, त्यांच्याघरात तीन तीन उमेदवार देते. पण यांनी काहीही केले तरी चालते. निवडणूक आयोग शेपूट घालून बसले आहे. आज आपण सावध झाला नाहीतर गुलामीत राहावं लागेल. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोत. तुमच्या विकासासाठी आण्हाला सत्ता पाहिजे असे ठाकरे म्हणाले.
गिरीश महाजनांनी कुंभमेळ्याची कामे गुजराती कंत्राटदारांना दिली – राऊत
५० हजार कोटींची कामे आगामी कुंभ मेळयासाठी होणार आहेत सध्या कामे सुरु आहेत. पण ही कामे सर्वसर्व गुजराती ठेकेदारांना दिली आहेत. हे काम पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी केला आहे. या ठेकेदारांची लिस्ट दिल्ली येथून आली होती. ते नाशिक स्मार्ट सीटी करणार होते. पण उत्तरेकडील शहरांपेक्षा वाईट अवस्था त्यांनी केली आहे. अशी थेट टिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब ग्राऊंड), शिवाजी नगर, नाशिक याठिकाणी शिवसेना मनसेची पहिली सभा पार पडली यावेळी संजय राऊत बोलत होते. पुढे ते म्हणाले या दोघांनी एकत्र येण म्हणजे महाराष्ट्राच्या मनातील आग बाहेर पडत आहे, श्रीरामांची- सावरकरांची भूमी नाशिक कुंभ नगरी लवकरच कुंभमेळा होईल जो भ्रष्टाचार माजलेला आहे तो या भगवेवाल्यांना दिसत नाही.




