नवी दिल्ली, दि.१३। वृत्तसंस्था संसदेच्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राहुल गांधींविरोधातील भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे वादळी ठरली. अदानी समूहाच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी करण्याची रणनिती आखली होती. मात्र, राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानांवरून संसदेमध्ये सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये भाजपने काँग्रेसवर डाव उलटवल्याचे पाहायला मिळाले. “लंडनमध्ये जाऊन देशाच्या लोकशाहीविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींनी लोकसभेत येऊन माफी मागावी. तसेच, त्यांच्या विधानांचा सभागृहातील सर्व सदस्यांनी निषेध करावा’, अशी मागणी केंद्रीय संरक्षणमंत्री व लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह यांनी केली. राज्यसभेतही सभागृहनेते पीयुष गोयल यांनी हीच मागणी केली. मात्र, “अदानी प्रकरणावर संयुक्त संसदीय समितीची मागणी केली की सभागृहात माइक बंद केला जातो. संसदेच्या सभागृहांमध्ये लोकशाही धोक्यात आल्याचे अवघ्या देशाने पाहिले आहे’, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते मल्लिकाजर्ुन खरगे यांनी विजय चौकात विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिले.
सत्ताधारी सदस्य व विरोधकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमधील भाषणांमध्ये केंद्र सरकार व भाजपविरोधात तीव्र टीका केली होती. संसदेमध्ये विरोधकांना बोलू दिले जात नाही, माइक बंद केले जातात. देशामध्ये लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, अशी वादग्रस्त विधाने केली होती. त्यावर, परदेशात जाऊन राहुल गांधींनी देशाचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. राहुल गांधींच्या विधानांवर सत्ताधारी पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील दालनामध्ये राजनाथ सिंह, पीयुष गोयल, प्रल्हाद जोशी आदी केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर सभागृहामध्ये राहुल गांधींविरोधात आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ राहुल गांधी बोलत होते. तरीही ते माइक बंद केला जात असल्याचा आरोप कसे करू शकतात, अशी संतप्त टिप्पणी संसदीय कामकाज राज्यमंत्री अजर्ुन मेघवाल यांनी केली.