राज्यसभेच्या रणांगणात ‘पवार’ विरुद्ध ‘शिंदे’? महायुतीच्या सातव्या उमेदवाराने वाढवली मविआची धाकधूक!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक आता एका अटीतटीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला दुसरा आणि महायुतीचा सातवा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे बिनविरोध होणारी निवडणूक आता चुरशीची होणार असून, मतांच्या बेरजेसाठी दोन्ही बाजूंनी गुप्त रणनीती आखली जात आहे.
महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना पुन्हा संधी देण्यावर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने सहमती दर्शवली आहे. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या चर्चेनंतर पवारांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. मात्र, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मास्टरस्ट्रोक’ खेळत अतिरिक्त उमेदवार उतरवण्याचा आग्रह धरला आहे. भाजपने हिरवा कंदील दिल्यास शिंदे गट आपला दुसरा उमेदवार मैदानात उतरवेल, ज्यामुळे सातव्या जागेसाठी मोठी ओढाताण पाहायला मिळू शकते.
सध्या १८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेल्याने पडद्यामागे मोठ्या हालचालींना वेग आला आहे. ५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने, उद्या संध्याकाळपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडी आपले पत्ते पूर्णपणे उघड करतील. १६ मार्च रोजी होणाऱ्या मतदानात संख्याबळाची जुळवाजुळव करताना कोणाची सरशी होते आणि ‘चाणक्य’ नीती कोणाची यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
—
Deepak Kaitke




