खरी खरी संपादकीय

न भयम्, न लज्जा

आज आपल्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांचा महाप्रचार सायंकाळी थांबणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये काय होते याचा विचार पुढे करू. पण नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर जे काही राजकारण सुरू आहे ते पाहिल्यावर आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे हेच समजत नाही. सत्तेसाठी किंवा वैयक्तिक मानापमानासाठी आपला पक्ष आणि पक्षाची ध्येयधोरणे व विचार खुंटीवर टांगण्याचे कार्य आपले निवडून आलेले नगरसेवक किती भंपकपणे करीत आहेत, हे पाहिल्यावर आपली मान लज्जेने खाली जाते.

राज्यात भारतीय जनता पक्ष, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन इंजिनांच्या महायुतीचे सरकार आहे. तिन्ही पक्षांची अतिशय वेगवेगळी धोरणे आहेत पण अनेक ठिकाणी या युतीपेक्षा विरोधी पक्षांबरोबरची आघाडी जास्त फायदेशीर ठरलेली दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट मध्ये तर एमआयएम बरोबर भारतीय जनता पक्षाच्या तेथील लोकांची युती झालेली आहे. अंबरनाथ येथील नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे सैनिक आणि शिंदे सेनेचे सैनिक एकमेकांविरुद्ध तलवारीच काढत आहेत.

येथे अंबरनाथ मध्ये शिंदे यांची शिवसेना अर्थात मोठा पक्ष आहे. पण भारतीय जनता पक्षाने काँग्रेस बरोबर युती केली. ज्यामुळे काँग्रेसच्या उच्च पदस्थांनी आपल्या पक्षातील बारा लोकांना आधी जाब विचारला आणि नंतर निलंबित केले आणि मग याच १२ लोकांनी पक्ष निष्ठेचे १२ वाजवून १२ च्या भावात जाऊन स्वतःला विकून टाकले. तेव्हा भारतीय जनता पक्ष विजयोत्सव साजरा करीत होता. मात्र त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेने अजब वाटणारी खेळी करून गजब उडवून दिलेला आहे. निवडून आलेल्या उमेदवारांच्या जादूई आकड्यामुळे उपनगराध्यक्षपदी शिंदे सेनेचा पुरस्कृत उपनगराध्यक्ष झालेला आहे. यामुळेच कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही, असे परस्परविरोधी चित्र दिसून येत आहे.

कोणे एकेकाळी हरियाणात आयाराम-गयाराम होण्याच्या घटना घडत असत. तेव्हा आपण सर्व त्यांच्या निष्ठेबद्दल त्यांना दूषणे देत होतो, आता तोच प्रकार सर्रासपणे महाराष्ट्रात सुरू आहे. आजकाल जशा नोकऱ्या टिकाऊ नसतात किंवा नोकऱ्या टिकवण्याची नोकरी करणाऱ्यांना गरज वाटत नाही. म्हणजेच आज एका कंपनीत तर उद्या दुसऱ्या कंपनीत अशी फिरवाफिरवी चालू असते. कंपनी असल्यामुळे तेथे निदान पगार तरी वाढतात. ज्यामुळे त्या ठिकाणी विचारसरणीची आणि ध्येय धोरण यांची गरज नसते.

इथे राजकारणात पक्षासोबत ध्येयधोरणे, विचारसरणी आणि उद्दिष्टे असतात. नेमकी तिथेच ‘सत्तातुरणां न भयम् न लज्जा’ अशी भयानक परिस्थिती आलेली आहे कारण, अगदी कालपर्यंत असलेला पक्का निष्ठावंत असा काही निसटून जातो की तो कसा निसटून जातो हे काही कळत नाही. ही नव्या प्रकारच्या राजकारणाची नांदी आहे काय हे आम्हाला माहीत नाही. तरीही महाराष्ट्रातील अशा प्रकारचे नवे राजकारण यापुढे कोणत्या थराला जाईल, याचा अंदाज करणारा निश्चितच पराभूत होईल, अशी स्थिती आलेली आहे.

 

-श्रीकृष्ण चांडक

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *