आपल्या राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे काम करणाऱ्या एका कारकूनने फक्त ३५ हजार रुपयांची लाच घेतली. त्यामुळे विनाकारण या विभागाची बदनामी झालेली आहे. झिरवळ साहेब असे काही करतील यावर कोणाचाही विश्वास नाही, आमचाही नाही. पण हे लाचेचे प्रकरण आता त्यांच्या खाजगी सचिवांवर उलटले आहे.
हे झिरवळ मविआ काळात विधानसभेचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार जाऊन युती सरकार आले. वर्षभरातच झिरवळ साहेबांनी जनतेची अनेक कामे मार्गी लावली असे अनेक जण सांगतात. एकदा तर त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी जिवाची बाजी लावून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून चक्क उडी मारली होती. त्यावेळेस मंत्रालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यामधील जागेत सुरक्षा जाळे लावलेले होते, त्यामुळे झिरवळ साहेब इतर कोणत्याही जाळ्यात न सापडता त्या जाळ्यातच अडकून आडवे झाले होते. याचा अर्थ जनतेच्या प्रश्नासाठी हे किती आग्रही आहेत हेच दिसून येत नाही काय?
त्यांच्या या तडफेमुळे आणि पक्षनिष्ठेपायी त्यांना द्वितीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या खात्यात बरीच हिरवळ आहे ते खाते झिरवळ साहेबांना प्रदान केले होते. एका सचोटीच्या माणसाला या खात्यातील फक्त विषारी गवताची हिरवळ संपवायचे काम करायचे होते, पण एका सामान्य कर्मचाऱ्याने लाच घेऊन या खात्याची अब्रूच धुळीला मिळवली.
आता त्यांचे खाजगी सचिवही बदलून गेलेले आहेत. म्हणजे बदलले नाहीत तर ते आपल्या जुन्या खात्यात रुजू झालेले आहेत. ‘कर नाही त्याला डर कशाला’ असे म्हणतात, त्यामुळे बहुधा त्यांनी स्वतःच आपल्या विभागात जाण्याची मनीषा व्यक्त केली असावी. मंत्र्यांकडे राहून आपल्या इमानदारीला बाधा येत असेल तर उगाच कशाला मंत्र्यांकडे राहायचे? त्यामुळे आपल्या मंत्र्यांच्या आणि आपल्या चारित्र्यावर डाग पडू नये म्हणून हा निर्णय मंत्री महोदय व त्यांच्या खाजगी सचिवांनी घेतला असावा.
एखाद्याने नको ते धंदे करायचे आणि विनाकारण मंत्र्यांची बदनामी ओढवून घ्यायची, हे काही योग्य नव्हते. खुद्द झिरवळ साहेबांनीही हे लाच प्रकरण आपल्यापर्यंत पोहोचत आहे असे दिसले तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत असे जाहीर केले होते. थोडक्यात ज्याने कुणी लाच घेतली त्याच्यावर जी व्हायची ती कारवाई होईल. तो या प्रकरणातून निर्दोष सुटेलही, पण त्यामुळे जे चटके मंत्रीमहोदयांना सहन करावे लागलेले आहेत, त्यांची व्यथा कोणी समजून घेणार आहे की नाही?
अजित पवार साहेबांनी दिलेली जबाबदारी कोणत्याही वादाविवादात न पडता पार पाडणे हे आपले परमकर्तव्य आहे अशा भावनेतूनच झिरवळ साहेबांनी काम केलेले आहे. आधी एक जागरूक आमदार, मग एक उपसभापती आणि सध्या महत्त्वाचे मंत्रीपद असलेले मंत्री हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे प्रतीकच आहे ना. त्यामुळे आता हे प्रकरण इथेच थांबेल आणि मंत्री साहेबांना ‘क्लीन चिट’ मिळेल असा बऱ्याच जणांना विश्वास वाटतो, त्यामुळे यावर आमचाही विश्वास आहे.



