आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीकधी इतके नम्र होतात की, ज्यामुळे नम्रताही लाजून चूर होऊ शकते. अशा जगात कोणी बॉस आहे असे म्हटले तर लोक त्याला वेड्यात काढतील. अरे पण वेड्या लोकांनो, खुद्द मोदीजींनीच हे जाहीर केले आहे की भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले नितीन नबीन हे माझे बॉस आहेत. नितीन या नावामुळे आश्चर्य वाटून घेऊ नका कारण ते नाव सर्वतोमुखी असते. पण त्याला नबीनचीही जोड मिळाली की मग तो बॉस बनतो. असे हे नितीन नबीन आणि भारतीय जनता पक्ष समवयीन आहेत.
१९८० च्या एप्रिल महिन्यामध्ये आपल्या मुंबई नगरमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. पक्षाची स्थापना झाली तेव्हाच ४५ वर्षांनंतरच्या अध्यक्षाचा जन्मही झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे अगदी तरुण वयात नितीन नबीन यांना आपल्या वडिलांच्या जागेवर आमदार होत आले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी या नितीनजींना ‘अरेतुरे’ करू नये म्हणून त्यांच्यासाठी वेगळ्या शब्दाची योजना करण्यात आलेली आहे. त्यांना यापुढे नावाने न पुकारता ‘अध्यक्षजी’ म्हणून संबोधावे, असे सांगण्यात आले आहे हे नक्कीच महत्त्वाचे आहे.
सत्तेच्या काळातच नाही तर पूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये अनेकदा नवखे अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत. नितीनजी गडकरी जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा ते फक्त ५२ वर्षांचे होते म्हणजेच, तोपर्यंत झालेल्या अध्यक्षांमध्ये ते सर्वाधिक तरुण होते, महाराष्ट्रातून आमदार होते. अगदी त्याच प्रकारे झारखंडमधील आमदार असलेल्या नबीन यांना अध्यक्षपदावर बसवण्यात आलेले आहे.
या ठिकाणी एक जुनी आठवण सांगणे खूप गरजेचे आहे ती म्हणजे, २०१३ साली भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अत्यंत आग्रहाने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी हेच सर्वात जास्त लायक उमेदवार आहेत, याचा प्रचारही आताच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी म्हणजेच नितीन नबीन यांनी केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यांना बॉस म्हटल्यामुळे या बॉसचा ठाय-ठाय वर कृपाकटाक्ष होईल तो खास बनणार आहे, यात शंकाच नाही.
भारतीय जनता पक्षाच्या पक्षाध्यक्ष पदावर या आधीचे अध्यक्ष नड्डाजी तरी कुठे जुने होते, पण इतकी वर्षे त्यांची हुकूमत पक्षावर नव्हती काय? किंबहुना नड्डाजी इतके प्रज्ञावंत होते की त्यांनी एकदा, ‘भारतीय जनता पक्ष आता इतका मोठा झाला आहे, ज्यामुळे भारतीय जनता पक्षाला सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज उरलेली नाही’, असे आत्मविश्वासपूर्वक सांगून त्यांनीही आपली बॉसगिरी दाखवली होती.
राजकारणात तेच ते चेहरे देऊन जनतेला बोअर करण्यापेक्षा नवनवीन छबीचे चेहरे देऊन पक्षाची लोकप्रियता दाखवायची असते, वाढवायची असते. कोणे एकेकाळी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना असे म्हटले जायचे की खांबाला जरी उभे केले तरी तो निवडून येईल. तो काँग्रेसचा काळ होता पण गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या इमारतीतील अनेक खांब वाळवीने पोकळ केलेले आहेत. सत्ता असली की आपोआपच जादूची छडी चालते, सत्ता गेली की त्या क्षणी त्या छडीची जादू आपोआपच नष्ट होते.
सध्या संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचा वारा चौफेर विजयाचे झेंडे फडकवीत आहे. अशा विशाल आणि प्रभावशाली पक्षाच्या अध्यक्षपदावर नितीन नबीन विराजमान झालेले आहेत. त्यांच्या सत्तेचा सूर्य आता तळपतच राहणार आहे. या नितीन नबीन यांच्याकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे आज्ञाधारक शिष्य आहेत. त्या पक्षाच्या अध्यक्षजींना काळजी करण्याचे अजिबात कारण नाही. आपल्या देदीप्यमान प्रतिभेने भारतीय जनता पक्षाचे नवीन अध्यक्ष आपल्या विजयाचे फासे फेकून संपूर्ण भारत भाजपमय करण्यासाठी झटणार आहेत ते त्यांनी आधीच सांगितलेले आहे.
दुसऱ्या एखाद्या पक्षात सत्तेच्या सर्वोच्च स्थानावरील व्यक्ती पक्षाच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीबद्दल इतका आदर दाखवील काय? भारतीय जनता पक्ष शिस्तीचा भोक्ता आहे. त्यामुळेच या पक्षाचे पोक्त नेतृत्व आपल्या नवीन अध्यक्षाला घेऊन पक्षाला यशाच्या गिरीशिखरावर नेऊन ठेवतील, यामध्ये शंका बाळगण्याचे कारण नाही.




