खरी खरी संपादकीय

हायकोर्टाचा सुपर झटका

न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली आणि मनसुब्यांचा इशारा दिला की, जग मोठ्या मोठ्या हुद्द्यावर असलेल्या आरोपींची नांगी आपोआप सैल होते. त्यानंतर तो आरोपी विनाशर्त कसा शरण येतो त्याचे एक वेगळे उदाहरण आज दिसले आहे. काल उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जामदार यांच्या एकलपीठाने एका मंत्री पुत्राबद्दल सर्वांनाच खडसावले. तो सर्रास बाहेर फिरतो पण पोलिसांना तो दिसतच नाही असे स्पष्टपणे घोषित केल्यावर आज तेच मंत्रीपुत्र महाशय न्यायालयाच्या आदेशाने पोलीस शरण आले.

तसेही ते फरार नव्हतेच आणि आपल्या शूर पोलिसांना त्यांना पकडणे कठीणही नव्हते. पण पोलीस विभागाला सुद्धा मागचे-पुढचे पाहून कधी स्टील सारखे कठोर तर, कधी रुईसारखे मऊ व्हावे हे बरोबर समजते. आता न्यायालयाने धाक धरल्यावर ते तरी काय करणार. मग पोलिसांनी धरून पकडून आणण्यापेक्षा आपण गुपचूपपणे पोलिसांच्या स्वाधीन होणे हेच उत्तम आहे असे त्या मंत्र्याच्या पुत्राला वाटले असावे. निवडणुकीच्या कालावधीत त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. पाठलाग, हाणामारी, पिस्तूल सारख्या प्राणघातक शस्त्राचा धाक असे या गुन्ह्यांचे स्वरूप आहे.

निवडणुकीच्या वेळी महाड येथे युतीमधल्याच दोन पक्षांमध्ये मोठा राडा झाला होता. ते दोन्ही पक्ष सरकारमध्ये सामील आहेतच. मात्र ज्याच्या नावाने दळभी गाजली केवळ तोच पोलिसांना शरण आला नाही. तर दुसरा पक्षही शहाजोगपणे पोलिसांच्या डायरीत दाखल झाला आहे. आम्हाला अशा थरार वागणुकीचा मनस्वी तिरस्कार आहे. जे शब्दाने होऊ शकते अशा प्रकारासाठी तलवारीच्या उपयोगाची गरजच काय. मात्र सध्या मंत्र्यांपेक्षा मंत्रीपुत्र केव्हाही भारी असतात. कारण मंत्र्याला निवडून यायचे असल्यामुळे अनेकदा नमते घ्यावे लागते आणि त्यांच्या पुढच्या पिढीला त्याची गरज नसते.

त्यामुळे जोपर्यंत गरज नाही, तोपर्यंत पडलो तरी टांग वर असाच त्यांचा खाक्या असतो. पण सध्या हे पुत्र कधी पडतच नाहीत कारण त्यांच्या मागे अनेक मंत्र्यांच्या भक्तगणांची आणि असंख्य शिष्यगणांची फौज सदैव उभी असते. सत्ता आहे म्हणून ही फौज आपल्यामागे उभी आहे हे त्यांनाही ठाऊक असते. त्याबरोबर ही सत्ता अखंड राहील अशा आत्मविश्वासामुळे वरील प्रकारासारखे प्रकार घडत असतात. आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे विद्वान न्यायाधीश जामदार साहेब किती न्यायप्रिय आणि कडक आहेत हे त्यांनी दाखवून दिलेले आहे.

न्यायालयात गेल्यावरती सामान्य ते अति महत्त्वाच्या व्यक्तीपर्यंत सर्वांना समान न्याय असतो. ह्या समानतेचा धागा दिसल्यामुळे एक दिवसाचाही विलंब न करता हे लंबकर्ण मंत्रीपुत्र आपले नाक मुठीत धरून शरणागत आले असावेत. हे सर्व आपल्या महाराष्ट्रात शक्य आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील गृहखाते याबाबतीत कडक कारवाई करणार आहे. हे दिसल्यामुळे त्या खात्याला फारशी मेहनत न घेताही आरोपी चालत येऊन त्यांच्या जाळ्यात पडलेले आहेत. राज्यात या आधीच शेकडो प्रश्न समोर उभे असताना अशा निष्कारण वादावादीसाठी सरकारची बदनामी करण्यापेक्षा जो दोषी आहे त्याची मानगुट पकडणे केव्हाही योग्य असते. त्यामुळेच हा न्यायालयीन फटक्याचाच परिणाम आहे यात शंका नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *