मनोज जरांगेंच्या सरकारपुढे ५ अटी

जालना, दि.१२। प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत सुरू असणाऱ्या आंदोलनावर आता लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू आहे. जरांगेंनी मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट करताना मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला १ महिन्याचा अवधी दिला. पण याचवेळी त्यांनी सरकारपुढे ५ अटीही ठेवल्या. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर आजपासून ३० दिवसांनी म्हणजे १२ ऑक्टोबर रोजी १०० एकरांत विराट सभा घेतली जाईल. या सभेला महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी यायचे. सभा अशी विराट घ्यायची की मराठ्यांचे नाव घेतले तरी सरकारचा थरकाप उडाला पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. ही जागा सोडणार नाही. माझ्या लेकरांचे मी तोंड पाहणार नाही. घराचा उंबरठा ओलांडणार नाही. यापुढे पुढील महिनाभर आमरण उपोषणाचे रुपांतर साखळी उपोषणात करा, असेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले. आपल्याला आंदोलनाची प्रतिष्ठा घालवायची नाही.

दिल्लीत शेतकऱ्यांनी तब्बल ८ महिने आंदोलन केले होते. आता आपण सरकारला १ महिना देऊ, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले. मराठा समाजाने एका महिन्याचा वेळ दिला आहे. राज्यभरात अहिंसक आंदोलन करा. समितीचा अहवाल कसाही आला तरी ३१ व्या दिवशी मराठा समाजातील सर्वांना जात प्रमाणपत्र द्यायचे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.दरम्यान, मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, जात बदनाम होऊ नये, म्हणून दोन पावले मागे हटत आहे. मी आमरण उपोषण सोडण्यास तयार आहे. पण जागा सोडणार नाही. महिन्याभरात सरकारने आरक्षण दिले नाही तर सरकार तोंडावर पडेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाची सर्वात मोठी सभा १२ ऑक्टोंबरला घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *