अशा ‘ अविरोध’ पेक्षा या पदांचा लिलावच करा: ज्येष्ठ संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा संताप…
अकोला: पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दृष्ट चक्र सध्या सर्वत्र बघायला मिळते. सत्ता मिळविण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. लोकशाहीचे असे सार्वत्रिक वस्त्रहरण होत असताना सर्व यंत्रणा मूग गिळून बसल्या आहेत. वारेमाप पैसा खर्च करून लोकांना विकत घेतले जात आहे. अशा परिस्थितीत असा खर्च करून मतदार विकत घेणाऱ्यांना निवडूनच देऊ नका, असा मंगळवारी अकोल्यात आयोजित परिसंवादातील सूर होता.
जिल्हा पत्रकार संघ, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ आणि दखल आदींच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवारी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात जनहित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ नगरसेवक कसा असावा आणि कसा नसावा’ या विषयावरील या परिसंवादात बोलताना मान्यवरांनी सध्याच्या परिस्थितीवर तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. याच परिसंवादात अध्यक्षीय पदावरून बोलताना ज्येष्ठ संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांनी अशा पद्धतीचे अविरोध उमेदवार निवडून येत असतील तर यापेक्षा सरकारने या पदांचा जाहीर लिलावच करावा असा संताप व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत पत्रकार संघाच्या समूहाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जेष्ठ संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या परिसंवादामध्ये डॉ. संजयजी खडक्कर, रामप्रकाशजी वर्मा, डॉ.अर्चना पोटे- सपकाळ, डॉ. जुबेर नदीम, सौ. सोनाली मोरे, लेखक तथा प्रखर वक्ते चंद्रकांतजी झटाले, प्रा. मुकुंदजी भारसाकळे, पुरुषोत्तम आवारे पाटील, ठाकूरदास चौधरी आदींनी आपले विचार मांडले.
आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारा नगरसेवक हा किमान शिक्षित असावा, त्याला मूलभूत सुविधांची जाणीव असावी, त्याला आपले कर्तव्य आणि आपल्या जबाबदाऱ्या कळायला हव्यात अशी अपेक्षा बहुतांश वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. अकोला शहराची गेल्या काही वर्षांमध्ये दुरवस्था झाली आहे.
एकेकाळी बगीचाचे शहर असा नावलौकिक असणाऱ्या या शहराला बघण्यासाठी बाहेर गावाहून मंडळी येथे यायची. आता मात्र येथील अवस्था बकाल झाली आहे. याला संबंधित नगरसेवक जेवढे जबाबदार आहेत तेवढेच त्यांना निवडून देणारे मतदारही जबाबदार आहेत. म्हणून आपला नगरसेवक निवडताना या सर्व बाबी जनतेने विचारात घ्यायला हव्यात. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे, सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची व्यवस्था नाही. त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. चालायला धड रस्ते नाहीत, आदि मुद्द्यांवर सर्वांनी प्रकाश टाकला. नगरसेवकांनी चुकीचे काम करू नये म्हणून नागरिकांनी सदैव सजग असावे असे मतही याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे सिद्धार्थजी शर्मा, जिल्हाध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, संजय खांडेकर, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील, सरचिटणीस ॲड.सुधाकर खुमकर, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, श्रमिक पत्रकार संघाचे प्रबोध देशपांडे, दखलचे प्रदीप गुरुखुद्दे, यांच्यासह राजू उखळकर, धनंजय मिश्रा, जावेद झकारिया, दीपक देशपांडे, कमल शर्मा, मनीष खर्चे, गजानन हरणे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून समारंभाला सुरुवात झाली. प्रास्ताविक सिध्दार्थजी शर्मा यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन संजय खांडेकर व ॲड.सुधाकर खुमकर यांनी केले तर शौकतअली मिरसाहेब यांनी सर्वांचे आभार मानले.
यापेक्षा या पदांचा लिलाव करा…प्रकाशभाऊ पोहरे यांचा संताप
या परिसंवादात आपले अध्यक्षीय भाषण करताना ज्येष्ठ संपादक आणि शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनी आपले रोखठोक विचार व्यक्त केले. सध्या सर्वत्र डॉक्टर, रुग्णालये, पोलीस स्टेशन, कारागृह यांची संख्या वाढली आहे. हे प्रगतीचे लक्षण समजायचे काय, असा सवाल उपस्थित करून स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही येथील लोकप्रतिनिधी लोकांना मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देऊ शकत नसतील तर यापेक्षा दुसरी शोकांतिका नसल्याचे ते म्हणाले. सर्वत्र माजलेला भ्रष्टाचार सामान्य माणसाचे जगणे कठीण करून गेला आहे. सत्तेत येण्यापूर्वी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी शेतमालाला भाववाढ देण्याचे आश्वासन दिले होते.
प्रत्यक्षात गेल्या बारा वर्षांमध्ये शेतमालाचे भाव वाढण्याऐवजी आणखी कमी झाले. एवढी परिस्थिती बिघडूनही कोणी रस्त्यावर येत नसेल तर आवाज कोणासाठी उठवायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सध्या शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जवळपास सर्व संस्था शासनाने ताब्यात घेतल्या असून आता कुणाकडूनही न्यायाची अपेक्षा करता येत नाही. गुंडमवाली निवडणुकांमध्ये निवडून येत असतील तर अशा निवडणुकांपेक्षा आणि अविरोध उमेदवार निवडून आणण्यापेक्षा इथल्या पदांचा जाहीर लिलाव सरकारने करावा, त्यातून निदान सरकारची तिजोरी तरी भरेल असा संतापही पोहरे यांनी यावेळी व्यक्त केला. या सध्याच्या निवडणुकीत कुणाच्याही भुला थापांना बळी न पडता जे उमेदवार खरोखर जनतेची कामे करतात, आपला वेळ देतात आणि निस्वार्थपणे जनतेची सेवा करतात अशा उमेदवारांनाच निवडून देण्याचे आवाहनही शेवटी पोहरे यांनी केले.




