आजकाल राजकारणी कुठे कधी काय बोलतील, कसे बोलतील, त्याचा काय परिणाम होईल याबद्दल जराही तमा बाळगत नाहीत. प्रत्येक पक्षात अशा वाचाळांची फौज तयार आहे. राजकारणातील परस्परांबद्दलचा आदर कुठे लयाला गेला आहे, समजत नाही.
राजकीय विरोधक म्हणजे आपला शत्रू आहे, अशा थाटात परस्परांविषयी टोमणेबाजी सुरू असते. गेल्या आठ-दहा वर्षात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसतात. कोणे एकेकाळी सख्खे सहकारी असलेल्या शिवसेनेच्या दोन गटात किती जहरी वाणीयुद्ध सुरू आहे याची प्रचिती आज अनेकदा येते. दोन्ही पक्षांकडून शाब्दिक लत्ताप्रहार करताना कोणालाच काही वाटेनासे झाले आहे. आज शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी विधिमंडळाऐवजी चोरमंडळ हा शब्द उच्चारल्यावर शिवसेनेचेच नव्हे तर सर्वपक्षीय आमदार त्या शब्दावरून मोठ्या प्रमाणावर संतापले होते. हक्कभंगापर्यंत प्रकरण गेलेले आहे. आपण उच्चारलेले शब्द योग्य नाहीत, असे खुद्द अजित पवार या विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे. यावरून प्रकरण किती गंभीर झाले आहे याची प्रचिती आलेली आहे.
आपले आमदार फुटलेले आहेत आणि आता ते आपले शत्रू आहेत अशा थाटात दररोज शिमगा करणे सुरू आहे. आजचे शब्द अंगाशी येतील, असे दिसून आल्यावर संजय राऊत यांनी आपण केवळ शिवसेनेच्या चाळीस आमदारांबाबत बोललो, असा खुलासा केला आहे. संजय राऊत जुने पत्रकार आहेत. त्यांना शब्द कसे वापरावेत हे सांगण्याची गरज नाही. आपण जे बोलतो ते विधिमंडळाच्या हक्कभंगाचे प्रकरण होऊ शकते हे त्यांना नक्कीच माहीत असेल. पण तरी राऊतांनी ते शब्द उच्चारले याचे कारण काय? याचे खरे कारण फुटलेल्या आमदारांसोबतचा अनावर राग हेच असले पाहिजे.
शब्द उच्चारल्यावर खुद्द राऊत यांनाही आपल्या वक्तव्याचे समर्थन करता आलेले नाही. म्हणूनच त्यांना खुलासा करावा लागला. आपण जे बोललो त्यात संपूर्ण विधिमंडळाचा विचार आपल्या मनात नव्हता, असे त्यांनी सांगितले. पण ‘बुंद सें गई वो हौद सें नहीं आती’ या उक्तीप्रमाणे जे व्हायचे ते होऊन गेले आणि त्यामुळे शिंदे गटाच्या हाती आयते कोलीत मिळाले. महाराष्ट्राचे राजकारण कधीच एवढ्या खालच्या पातळीवर गेले नव्हते. आता राऊतांनी कितीही खुलासे केले तरी हे प्रकरण इथेच संपेल असे समजण्याचे कारण नाही. सत्तारूढ पक्षाला त्याचा फायदा करून घेणे फायद्याचे ठरणार आहे. बोलण्याच्या ओघात मर्यादा सोडली तर त्याचे किती घातक परिणाम होतात, याचा अनुभव राऊत यांना आला असावा. आता हे प्रकरण काय रंग दाखविते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बघू आता पुढे काय होते ते…