मुंबई, दि.२८। प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या जमिनी जलसमृद्ध करून देणारे जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन सुरू करण्यात आले आहे. या योजनेत पाच हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे गावे जलसमृद्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे व नदीकाठच्या गावांचेही नुकसान झाले आहे. बाधित ब्राह्मणवाडा भगत, शिराळा व यावली येथील खोलीकरण तसेच बांध दुरुस्तीच्या कामास जिल्हा नियोजन समिती, अमरावती यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून सद्यस्थितीत कामे प्रगतीपथावर आहेत.
उर्वरित कामे जलयुक्त शिवार अभियान दोन मध्ये घेण्याचे प्रस्तावित आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याबाबतच्या लेखी उत्तरात सांगितले. याबाबत अधिकची माहिती देताना मंत्री प्रा.तानाजी सावंत म्हणाले की, जलयुक्त शिवार योजना टप्पा एक मुळे विदर्भ, मराठवाड्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार योजना टप्पा दोन मध्ये गाळाने भरलेले ओढे व नाले सुस्थितीत करण्यात येणार आहेतर्.ंयाबाबतचा प्रश्न सदस्य ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला होता.