काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन
राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच राजकीय पटलावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दिवंगत माजी मुख्यमंत्री यांच्या आठवणी पुसल्या जातील. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने मोठी खळबळ
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शहरात प्रचारासाठी आले होते. यावेळी कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाषणाच्या ओघात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.. ते म्हणाले लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसतो, तो पाहता विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील यात शंका नाही. या वक्तव्याने राजकारण तापले असून विशेषतः काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख यांचे पुत्र यांनी संयम राखत मात्र तितक्याच ठामपणे प्रत्युत्तर दिले कि, लिहिलेले पुसल्या जाऊ शकते पण कोरलेले नाही.
आमचे काम काढणाऱ्यांनी एकदा आरसा पाहावा, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचा घेतला समाचार
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे, कोणी आम्हाला काय काम केले हे विचारणार असेल तर त्यांनी एकदा आरसा पाहावा. आपण जेवढे मागे पाहू तेवढा वाद वाढेल असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना वाद न वाढविण्याचा सल्ला दिला
मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपच्या वाटेवर
उद्धवसेना मनसे युतीमुळे इच्छुक उमेदवारांची कोंडी होत आहे. मुंबई येथे वॉर्ड क्रमांक १९४ वर मोठा वाद झाला होता. या जागेसाठी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी इच्छुक होते. पण हि जागा उद्धवसेनेला सोडण्यात आली. यातच नाराज संतोष धुरी यांनी मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला
भाजपच्या प्रचारसभेत महिला नाचविल्यावरून विरोधकांची संतापाची भूमिका
मुंबईतील वॉर्ड क्रमांक १५७ मध्ये भाजप उमेदवार आशाताई टायदे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र या ठिकाणी महिला नाचविण्यात आली. महापुरुषांच्या प्रतिमेसमोर हा प्रकार घडल्याने विरोधकांसह नागरिकांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.
चंद्रपुरात ३६५ दिवसांपैकी २०१ दिवस जास्त प्रदूषण
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारे दररोज २४ तास घेण्यात येणाऱ्या सतत हवा गुणवत्ता निरीक्षणाचा २०२५ या वर्षातील प्रदूषणाची आकडेवारी पाहता ३६५ दिवसात चंद्रपूरमध्ये केवळ ७८ दिवस प्रदूषणमुक्तीचे ठरले. ८६ दिवस समाधानकारक, १८७ दिवस प्रदूषणाचे, १३ दिवस जास्त प्रदूषणाचे ठरले तर एक दिवस अतिप्रदूषित होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रणमंडळच्या निरीक्षणावरून हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा सादर_ करमाफी, मोफत बस, २४ तास पाणी
नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत शहराच्या विकासासाठी महत्वाकांक्षी आणि जनहितकारी आराखडा मांडला. स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर हे एकमेव ध्येय ठेवत काँग्रेसने २० सूत्रांचा सर्वसमावेशक कार्यक्रम जाहीर केला असून नागपूरकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित १७ हुन अधिक योजनांचा यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ५०० चौरस फुटांपर्यंत घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफी, अखंड पाणीपुरवठा, आपली बससेवेमध्ये महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांसाठी मोफत प्रवास , रस्ते खड्डेमुक्त करणे यांचा समावेश आहे.
………………………..
चलनात नसलेल्या दोन हजारांच्या नोटा बदलण्याची संधी
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून बाद केलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी नोटा अजूनही पूर्णपणे परत आल्या नसून सुमारे ५८१७ कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या या नोटा अजूनही लोकांकडे आहेत. १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा आरबीआय ने केली होती. यानंतर ३१ ऑक्टोबर २०२५ च्या आकडेवारीनुसार अजूनही ५८१७ कोटी रुपये मूल्याच्या २००० रुपयांच्या नोटा परत येणे केंद्रीय बँकेला अपेक्षित आहे. आरबीआय ने ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्व बँकांच्या शाखेमध्ये नोटा बदलण्याची सुविधा दिली होती. मात्र आद्यपही १. ६३ टक्के नोटा परत येणे बाकी असल्याने आरबीआय च्या १९ कार्यालयांमध्ये अजूनही तुम्ही या नोटा बदलवून घेऊ शकता.
…………..




