विशेष प्रतिनिधी:मुंबई: सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’ आणि खेड्यापाड्यात हक्काने धावणारी ‘लालपरी’ आता प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. इंधन दरवाढ आणि महागाईच्या भडक्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित कोलमडले असून, ही तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने आता तिकीट दरवाढीची तयारी केली आहे.
डिझेल, वंगण आणि सुट्ट्या भागांच्या (Spare parts) किमती गगनाला भिडल्याने एसटीचा देखभाल खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे महामंडळाने सर्व प्रकारच्या बस सेवांसाठी सरसकट २ टक्के दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे ही वाढ केवळ साध्या बसपुरती नसून ‘शिवशाही’, ‘अश्वमेध’ ते थेट ‘शिवनेरी’पर्यंतच्या सर्व गाड्यांना लागू होण्याची शक्यता आहे.
या महत्त्वाच्या प्रस्तावर निर्णय घेण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आज (शुक्रवारी) एक तातडीची आढावा बैठक घेणार आहेत. यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये झालेली मोठी भाडेवाढ प्रवाशांच्या पचनी पडली नव्हती. त्यामुळे लोकांचा रोष टाळण्यासाठी, एकदम मोठा बोजा न टाकता दरवर्षी ‘टप्प्याटप्प्याने’ अल्प वाढ करण्याचे धोरण अवलंबले जात असल्याचे समजते.
आजच्या बैठकीत जर या प्रस्तावाला ‘हिरवा कंदील’ मिळाला, तर येत्या काही दिवसांतच एसटीचा प्रवास महागणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे महागाईने आधीच त्रस्त असलेल्या चाकरमान्यांवर आणि ग्रामीण जनतेवर याचा किती भार पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




