माणूसपणाची पाऊलवाट

अजिंक्य: ध्येयवेड्या तरुणाची जागतिक भरारी: शिक्रापूर ते स्पेन असा फुटबॉलचा गौरवशाली प्रवास

अजिंक्य जेव्हा घरून निघाला, तेव्हा त्याच्या मनात एकच ध् यास होता, हे जग काबीज करण्याचा. त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. खेळाची ओढ त्याच्या नसानसात इतकी भिनली होती की, त्या विशाल मैदानापुढे त्याला संपूर्ण जग छोटं वाटू लागलं होतं. पदवी, नोकरी आणि व्यवसाय या पारंपारिक चौकटीत न अडकता त्याने सर्वात आधी निवडलं ते फुटबॉलचं मैदान. पुण्याच्या शिक्रापूरचा हा तरुण आज सातासमुद्रापार स्पेनमध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावतोय, ही केवळ त्याची वैयक्तिक प्रगती नसून महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

अजिंक्यची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सधन आणि सुशिक्षित. वडील डॉ. कुमार मांढरे हे पुण्यातील नामवंत बालरोगतज्ज्ञ, तर आई अनुषा मांडरे एका प्रख्यात भारती विद्यापीठ मधून प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या. घरात मामा जिल्हाधिकारी, तर काका यशस्वी शेतकरी. अशा सुसंस्कृत आणि यशस्वी लोकांच्या गराड्यात वाढणाऱ्या मुलाने डॉक्टर किंवा प्रोफेसर व्हावं, अशी पालकांची स्वाभाविक इच्छा होती. पण या ‘पठ्ठ्या’चं मन मात्र पहाटेपासून रात्रीपर्यंत केवळ फुटबॉलच्या किकमध्ये रमायचं. त्याला फुटबॉलमध्ये केवळ करिअरच करायचं नव्हतं, तर या खेळाचा रस प्रत्येक तरुणाच्या मनात रुजवायचा होता. स्वतःच्या छंदाला ध्यासात रूपांतरित करून त्याने जे विश्व उभं केलं, ते पाहून आज त्याच्या पालकांचा ऊर अभिमानाने भरून येतो.

अजिंक्यचा हा प्रवास २०१५ मध्ये सुरू झाला, जेव्हा तो शिक्षणाच्या निमित्ताने, एमबीए करण्यासाठी स्पेनला गेला. ज्या फुटबॉल विश्वाचं केंद्र म्हणून स्पेन कडे पाहिलं जातं, तिथल्या माड्रिड शहरात त्याला आपल्या कौशल्याची चुणूक दाखवण्याची संधी मिळाली. आज तो तिथल्या ‘युनिकॉन स्पोर्ट्स’मध्ये एका मोठ्या पदावर कार्यरत आहे. खेळाडू ते थेट मॅनेजमेंट आणि कोचिंगपर्यंतची त्याची मजल थक्क करणारी आहे. २०३० चा फुटबॉल वर्ल्डकप स्पेनमध्ये होणार आहे आणि या मोठ्या जागतिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य मांढरे तिथे भारतीय संस्कृतीची आणि आपल्या कार्यक्षमतेची छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

आपल्या अनुभवांबद्दल बोलताना अजिंक्य अत्यंत सकारात्मकतेने सांगतो की, खेळाकडे केवळ छंद म्हणून न पाहता ते करिअर, आरोग्य आणि नाविन्यपूर्ण शोधाचं एक माध्यम म्हणून पाहिलं पाहिजे. अनेकदा तरुण मुलं भविष्याबद्दल गोंधळलेली असतात, अशा वेळी अजिंक्य मांढरे त्यांना हाच सल्ला देतो की, तुम्हाला जे मनापासून आवडतं, त्यामध्येच झोकून देऊन काम करा. त्याने भारतातही अनेक मुलांना फुटबॉलचे धडे दिले आहेत आणि आता स्पेनमध्ये मॅनेजमेंटची जबाबदारी सांभाळताना त्याला आपल्या मातीचा विसर पडलेला नाही. तिथल्या सरकारचा खेळाप्रती असलेला गांभीर्य पाहून, तसाच दृष्टिकोन जगभरात निर्माण व्हावा, अशी त्याची प्रामाणिक इच्छा आहे.

​​”जेव्हा मी आज माड्रिडच्या या भव्य फुटबॉल स्टेडियममध्ये उभा राहतो आणि भोवताली हजारो लोकांचा जल्लोष ऐकतो, तेव्हा क्षणार्धात माझे मन हजारो मैल दूर पुण्यातील शिक्रापूरच्या त्या धुळीने माखलेल्या मैदानावर पोहोचते. माझा हा प्रवास केवळ एका शहरातून दुसऱ्या शहरात केलेला प्रवास नाही, तर तो एका स्वप्नाचा पाठलाग करताना स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्ष आहे. आजही आठवतो तो काळ, जेव्हा हातात फुटबॉल घेऊन मी तासनतास सराव करायचो. घरात वडिलांच्या रूपात वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श होता आणि आईच्या रूपात ज्ञानाची शिदोरी होती. एक डॉक्टर म्हणून वडिलांना मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकावे असे वाटणे स्वाभाविक होते, तर आईला मी एका मोठ्या पदावर काम करताना पाहायचे होते. अशा सधन आणि उच्चविद्याविभूषित वातावरणात ‘फुटबॉल’ हे करिअर म्हणून निवडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते. पण माझ्या मनात त्या कातडी चेंडूने जे स्थान निर्माण केले होते, त्यापुढे मला जगातील इतर कोणतीही पदवी मोठी वाटत नव्हती.
२०१५ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा शिक्षणाच्या निमित्ताने स्पेनच्या भूमीवर पाय ठेवला, तेव्हा डोळ्यांत स्वप्ने आणि मनात थोडी धाकधूक होती.

सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. भाषेचा अडथळा, घराची आठवण आणि एका परक्या देशात स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आव्हान समोर होते. पण जसा काळ सरकत गेला, तसा स्पेनचा हा ‘फुटबॉल वेडा’ देश मला आपला वाटू लागला. आज जेव्हा मी ‘युनिकॉन स्पोर्ट्स’मध्ये एका जबाबदार पदावर काम करतो, तेव्हा मला जाणीव होते की, माझ्या जिद्दीने केवळ माझे आयुष्य नाही, तर माझ्या पालकांचे मस्तकही अभिमानाने उंच केले आहे.

आज जेव्हा माझे बाबा आनंदाने लोकांना सांगतात की त्यांचा मुलगा स्पेनमध्ये फुटबॉल विश्वात नाव कमावतोय, तेव्हा त्यांच्या आवाजातील तो थरार माझ्यासाठी कोणत्याही जागतिक पुरस्कारापेक्षा मोठा असतो असे अजिंक्य सांगत होता, तर अजिक्यच्या आई म्हणाल्या, “आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा डोळ्यांसमोर येतो तो छोटासा अजिंक्य, जो घरातल्या भिंतींवर फुटबॉल मारून आवाज करायचा. तेव्हा मला राग यायचा, मी ओरडायचे, कारण एका आईच्या मनात मुलाच्या भविष्याबद्दलच्या साध्या-सुध्या अपेक्षा होत्या. आम्ही दोघेही उच्चशिक्षित, घरात अभ्यासाचं वातावरण, त्यामुळे त्यानेही त्याच वाटेवर जावं असं वाटणं स्वाभाविक होतं. मी स्वतः प्रोफेसर होते, त्यामुळे मला वाटायचं माझ्या मुलानेही ज्ञानाच्या क्षेत्रात नाव कमावावं. पण त्याच्या नसानसात मात्र खेळाचं वेड धावत होतं. आज जेव्हा जगाच्या नकाशावर तो स्वतःचं स्थान निर्माण करताना दिसतोय, तेव्हा मला माझ्या त्या ओरडण्याचं हसू येतं आणि त्याच्या जिद्दीचं कौतुक वाटतं.

एक आई म्हणून मुलाला स्वतःपासून हजारो मैल दूर पाठवणं सोपं नसतं. २०१५ मध्ये जेव्हा तो स्पेनला जायला निघाला, तेव्हा काळजात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. परका देश, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती… तिथे माझा मुलगा कसा राहील, काय खाईल, त्याला कोणाची सोबत मिळेल, असे असंख्य प्रश्न मनात होते. पण अजिंक्यने कधीच आम्हाला त्याची उणीव भासू दिली नाही. त्याने तिथल्या आव्हानांना आपलंसं केलं. आज तो तिथे केवळ स्वतःचं करिअर करत नाहीये, तर भारताच्या अनेक मुलांसाठी संधीचे दरवाजे उघडून देतोय, हे ऐकून ऊर अभिमानाने भरून येतो.

मला आठवतंय, तो लहान असताना कित्येकदा खेळाच्या नादात जेवायचं विसरून जायचा. आज तोच ध्यास त्याला स्पेनच्या माड्रिडसारख्या शहरात घेऊन गेला आहे, जिथे फुटबॉलचा श्वास घेतला जातो. २०३० चा वर्ल्डकप स्पेनमध्ये होणार आहे आणि त्या मोठ्या नियोजनाचा माझा मुलगा एक भाग असणार आहे, हे स्वप्नवत वाटतं. जेव्हा तो फोनवर तिथल्या गोष्टी सांगतो, तेव्हा त्याच्या आवाजातला तो उत्साह बघून मला जाणीव होते की, आम्ही त्याला डॉक्टर किंवा प्रोफेसर बनवलं असतं, तर कदाचित तो इतका आनंदी नसता. त्याने त्याच्या आवडीचं सोनं केलंय.
एक काळ असा होता की आम्हाला काळजी वाटायची की खेळाचं मैदान त्याला आयुष्यात कुठे घेऊन जाईल? पण आज त्याने दाखवून दिलं की जर प्रामाणिक कष्ट आणि खेळावर निस्सीम प्रेम असेल, तर ते मैदान तुम्हाला आभाळाएवढं यश मिळवून देऊ शकतं. शिक्रापूरच्या मातीत खेळणारा माझा मुलगा आज जागतिक फुटबॉल मॅनेजमेंटमध्ये आपली ओळख निर्माण करतोय, यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा

एका आईसाठी दुसरी कोणती असू शकते?आईसाठी अजिंक्यचा सर्व प्रवास एक इतिहास आहे.
२०३० चा फुटबॉल वर्ल्डकप स्पेनमध्ये होणार आहे, ही बातमी ऐकल्यावर मनात एक वेगळीच ऊर्मी दाटून येते. या जागतिक सोहळ्याचा एक भाग होणे आणि तिथे आपल्या भारतीय संस्कृतीची छाप उमटवणे, हेच आता माझे ध्येय आहे. मला नेहमी वाटते की, भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांमध्ये अफाट टॅलेंट आहे. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची आणि संधीची गरज आहे. मी जेव्हा इथल्या मॅनेजमेंटमध्ये काम करतो, तेव्हा माझ्या मनात नेहमीच माझ्या देशातील त्या तरुण खेळाडूंचा विचार असतो, ज्यांना फुटबॉलमध्ये करिअर करायचे आहे. मी या खेळाला केवळ एक खेळ मानत नाही, तर ती एक जीवनपद्धती आहे असे समजतो.

अनेकांना वाटते की खेळाकडे वळल्याने करिअर खराब होते, पण मला त्या सर्वांना सांगायचे आहे की, जर तुमच्यात जिद्द असेल, तर खेळ तुम्हाला आरोग्य, नाव आणि जागतिक ओळख मिळवून देऊ शकतो. आज मी जो काही आहे, तो माझ्या पालकांच्या आशीर्वादाने आणि फुटबॉलवर असलेल्या निस्सीम प्रेमामुळे. शिक्रापूर ते स्पेन हा प्रवास खडतर होता, पण तो तितकाच सुंदरही आहे. अजून खूप काही मिळवायचे आहे, अजून खूप काही शिकायचे आहे, पण या सगळ्यात माझ्या मातीचा सुगंध आणि भारताचा तिरंगा नेहमीच माझ्या काळजाच्या जवळ असेल. हे जग काबीज करायला निघालो असलो, तरी माझी मुळं आजही महाराष्ट्राच्या मातीतच रुजलेली आहेत.”

अजिंक्यने स्वीकारलेलं हे फुटबॉलचं ‘धनुष्य’ तो समर्थपणे पेलत आहे. त्याची ही धडपड भारतातील त्या प्रत्येक तरुणासाठी आदर्श आहे जो आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडतोय. अजिंक्यने जगभरातील सर्व कौशल्ये आत्मसात करावीत आणि आपल्या देशाला फुटबॉलच्या नकाशावर गौरवास्पद स्थान मिळवून द्यावे, हीच प्रत्येक भारतीयाची भावना आहे. त्याच्या या ‘अजिंक्य’ प्रवासाला आणि भावी वाटचालीस आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा.

अजिंक्य मांढरे संपर्क क्रमांक
9890346430

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *