माणूसपणाची पाऊलवाट

शाश्वत सौंदर्याचा ध्यास : श्रीकांत मोरे

असं म्हणतात की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं, आणि याही पलीकडे जाचत ते त्याच्या अंतर्मनातील विचारातून झळकत असतं. जगाकडे बघण्याची विलक्षण सकारात्मक सौंदर्यदृष्टी ज्याच्यात असते तो वाळवंटातही हिरवळ निर्माण करण्याची ताकद ठेवतो. जगण्यातील संवेदनांमध्ये शाश्वत सौंदर्याचा ध्यास बाळगणारा असाच एक अचाट, विलक्षण, दृढ, आणि चैतन्याचा खळखळता झरा असलेला व्यक्ती मी अनुभवला तो म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत सदाशिव मोरे.

कोऱ्या पाटीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते, तुमच्या आमच्या मनाचे असे असते तर समाजाचे किती बरे झाले असते असे म्हणणारे श्रीकांत मोरे यांनी आपले मन पाटीप्रमाणे ठेवले. ज्यावर नकारात्मक अनुभव पुसत त्यातून सुंदर सृजनात्मक अनुभवांची अक्षरेच नेहमी कोरली.

सोलापूर येथे शिक्षणाधिकारी असलेले वडील सदाशिव मोरे व आई मनोरमा मोरे यांच्या पोटी जन्मलेले शेंडेफळ म्हणजे श्रीकांत मोरे. आईवर प्रचंड प्रेम असणाऱ्या श्रीकांत मोरे यांच्यावर वडिलांच्या शिस्तीचा आणि विचारांचा कायम पगडा होता. लहानपणापासून असलेली वाचनाची आवड पुढे साहित्याच्या गोडीमध्ये परावर्तित झाली, ती महाविद्यालयातील साहित्यविषयक सृजनात्मक उपक्रमांतून आणि हे साहित्य प्रेम अधिक व्यापक आणि समृद्ध झाले ते त्यांच्या इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासातून. त्यांनी महाविद्यालयीन व बीए इंग्रजी वाङ्मयाचे शिक्षण सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयातून पूर्ण केले तर दयानंद महाविद्यालयातील इंग्रजी वाङ्मयात एमए पूर्ण केले.

एमए इंग्लिश करताना इंग्रजी कवि विशेषतः ज्यांनी प्रेम कविता अथवा निसर्ग कविता लिहिल्या त्यापैकी पी.बी.शेली, वर्डस्वर्थ, क्रिट्स, लिल्टन लॉर्ड, बायरन, मेरी शेली, सेक्सपियर त्याबरोबर इतर भाषेतील रोमँटिसीझमचा अभ्यास झाला. आणि यातूनच त्यांची साहित्याची जाणीव प्रगल्भच झाली नाही तर जीवनाकडे बघण्याची शाश्वत सौंदर्यदृष्टी त्यांना प्राप्त झाली. नव्हे तर त्याचा त्यांनी ध्यासच घेतला.

प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्याचा शोध घेण्याच्या ध्यासानेच त्यांना कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये लागलेली शिक्षकाची नोकरी, तेथील इंग्रजाळलेल्या वातावरणाची घेतलेली धास्ती याचे परावर्तन सकारात्मक दृष्टिकोनात त्यांनी केले आणि स्वतःतील आत्मविश्वास मजबूत केला.

ते प्रकर्षाने सांगतात की, या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जी आत्मविश्वासाची मोट मी बांधली त्याचा मला आयुष्यभर फायदा झाला. एमपीएससी च्या परीक्षेतील दिव्य पार करण्यासाठी अभ्यासासोबतच त्यांनी ही परीक्षा पास झालेल्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या. त्यांना उमगले की ही माणसे फार साधी आहेत. ही माणसे या पदापर्यंत पोहोचू शकतात तर आपण का नाही. यातूनच त्यांना माणसे वाचण्याचा आणि जोडण्याचा व्यासंग जडला. ही परीक्षा पास करीत ते अकाउंट ऑफिसर म्हणून रुजू झाले. यानंतर पीएसआय, सेल टॅक्स ऑफिसर, रजिस्टार अशा विविध प्रकारच्या परीक्षा त्यांनी पास केल्या. पण यामध्ये त्यांनी सहकार क्षेत्रातील असिस्टंट रजिस्टारची नोकरी स्वीकारली.

श्रीकांत मोरे म्हणतात की ज्या अकाउंट्स व गणिताशी माझा छत्तीसचा आकडा होता अशाच क्षेत्रामध्ये मला सेवा द्यावी लागली ही माझ्या जीवनातील मोठी विसंगती आहे. पण या विसंगतीचे त्यांनी सुगंधित फुलांमध्ये रूपांतर करून या किचकट, निरस क्षेत्रातही सजीवता निर्माण केली. ते मोठ्या अभिमानाने सांगतात की सहकार क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी 25 नागरिक सहकारी बँकांची स्थापना केली आणि अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला.

ते प्रकर्षाने सांगतात की , सहकार क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी साहित्य प्रेम नेहमीच जोपासले. यातून अनेक साहित्यिक मान्यवरांच्या त्यांच्या ओळख्या झाल्या. सुरुवातीला त्यांनी लिहिलेल्या कवितांना आकाशवाणी पर्यंत पोहोचविण्याचे काम मधुकर कांबळे यांनी केले तर तेथील हार्डीकर साहेबांनी त्यांच्या कवितांना निश्चित दिशा दिली.

यातून त्यांच्या कविता फुलत गेल्या. महाविद्यालयातील डॉ. निर्मलकुमार फडकुले आणि हिरेमठ सर यांचे त्यांना नेहमीच मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या रंग भावलेले या काव्यसंग्रहास डॉ.गो.मा. पवार, तसेच इतर दोन कवितासंग्रहांना डॉ.निर्मलकुमार फडकुले, ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर, डॉ. द.ता.भोसले यांची प्रस्तावना आहे. या दिग्गज साहित्यिक मंडळींचे सातत्याने त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यामुळे त्यांच्या कविता उत्तमोत्तम होत गेल्या. आईच्या निधनानंतर मातृप्रेमी मोरे यांनी आईवर 200 ते 300 कविता लिहिल्या आहेत. याशिवाय त्यांच्या साहित्यसंपदेत 22 कविता संग्रह, 3 कथासंग्रह आणि 5 ललित लेखनांचा समावेश आहे.

सामान्यांच्या आर्थिक अडचणी सोडविता याव्या यासाठी सहकारी बँक स्थापन करावी अशी वडिलांची इच्छा मोरे यांनी मूर्तीमंत स्वरूपात आणली आणि आपल्या आईच्या नावाने मनोरमा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली. या बँकेचे आता वटवृक्षात रूपांतर झाले असून या बँकेची उलाढाल हजार कोटींच्या घरात गेली आहे. लक्ष्मीची पूजा करीत असताना सरस्वतीलाही अधिष्ठान देण्यासाठी त्यांनी मनोरमा साहित्य मंडळीची स्थापना केली.

2002 ला घेतलेले शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे साहित्य संमेलन खूप गाजले आणि याला भरघोस प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 11 साहित्य संमेलने घेण्यात आली असून ही सर्व राज्यच नाही तर देशव्यापी झाली आहे. मनोरमा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीचे क्षण त्यांच्या तर मनाला भारावून टाकतात.या साहित्य संमेलनातून प्रचलित व नवोदित कवी व लेखकांना सन्मानित करून सामान्यांच्या घरापर्यंत साहित्य ते पोहोचवीत आहेत. मनोरमा कवितासंग्रह हे पुस्तक वडोदरा विद्यापीठ येथे अभ्यासाला घेतलेले आहे. हा सर्व प्रवास ते नीती मूल्ये आणि माणुसकीच्या मार्गावरून करीत आहेत.

पर्यटन आणि निसर्ग हा सुद्धा त्यांच्या आवडीचा विषय आहे. तीस एकर जमिनीवर पंधरा हजार केशर व हापूस आंब्याची लागवड केली आहे.विविध देशांची वारी करून तेथील साहित्य व संस्कृती याचे ते अवलोकन करतात व त्याचा साहित्यात कसा समावेश करता येईल यासाठी प्रयत्नरत असतात. या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांच्या पत्नी शोभा मोरे आणि त्यांचे कुटुंब त्यांना सर्व परीने मदत करीत आहेत

मनोरमा अर्बन को-ऑपरेटिव बँक, मनोरमा सोशल फाउंडेशन, मसाप मनोरमा शाखा, मनोरमा साहित्य मंडळीचे अध्यक्ष असलेले श्रीकांत मोरे यांनी अर्थकारण आणि साहित्य संस्कृती या दोन टोकांचा दुर्लभ मेळ दिसून येतो तो त्यांच्या सत्य, सुंदर सर्वथा अशा आजन्म ध्यासामुळे. आणि हा त्यांचा ध्यास आणि चैतन्याचा झरा अखंड प्रवाहित राहो यासाठी आमच्या अनेक अनेक शुभेच्छा.

श्रीकांत मोरे संपर्क क्रमांक
7020600024

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *