शाळेपेक्षा शाळाबाह्य उपक्रमांमध्ये सदैव रमलेले, समाजातील दुःख, करुणा, कष्टकरी, शेतकरी यांच्या हालअपेष्टांनी भरलेले उपेक्षित जगणे, स्त्री-जाणिवा यांचे प्रतिबिंब आपल्या लिखाणातून समाजासमोर उजागर करणारे ज्येष्ठ साहित्यिक दगडू मथुरा बाबुराव लोमटे सांगतात की, मानवाचे जीवन अधिक समृद्ध होत असते ते त्याच्या जीवनानुभवांतून. या जीवनानुभवांना अधिक व्यापक दृष्टी देण्याची ताकद साहित्यात दडलेली आहे.
साहित्याविषयी प्रेम, रुची आणि आस्वादकता निर्माण करून नव्या दमाचे लेखक, कवी, कथाकार, गझलकार घडवण्याबरोबरच साहित्य-संस्कृतीच्या संवर्धनाची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारे दगडू लोमटे हे यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या माध्यमातून अहोरात्र झटत मराठवाड्यातील अंबाजोगाईचे सांस्कृतिक दूत म्हणून नावारूपास आले आहेत.
दगडू लोमटे मोठ्या कृतज्ञ भावनेने सांगतात की, माझ्या जडणघडणीत शिक्षक असलेले वडील बाबुराव लोमटे आणि आई मथुरा बाबुराव लोमटे यांचा फार मोठा वाटा आहे. वडील शिक्षक असल्याने पुस्तकांचा सहवास लाभला. कुटुंबवत्सल आईचे माणसांवरील प्रेम आणि भूतदया यांतून माझ्या सामाजिक जाणिवांच्या कक्षा अधिक वृद्धिंगत झाल्या. यावेळी ते बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले त्यांचे चुलते भगवानराव लोमटे यांची प्रकर्षाने आठवण करून देतात.यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याने प्रेरित झालेले भगवानराव लोमटे राजकारणात रमले असले, तरी त्यांना नाटक, संगीत, लावणी, कथा, शायरी यांचीही ओढ होती. त्यांच्या सान्निध्यात राहूनच साहित्याची गोडी निर्माण झाली.
यातूनच खेड्यावर बहिणीकडे शिक्षण घेत असताना ग्रामीण जीवनातील वास्तव, कष्टकरी शेतकऱ्यांचे दुःख, स्त्रीविश्व त्यांनी शब्दबद्ध केले. त्यांच्या हातून पहिल्या कवितेची निर्मिती झाली आणि ते लिहिते झाले. या लिखाणाचा प्रवास सुरू झाला. अनेक वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंकांतून त्यांनी लेख व कविता लिहिल्या. यातूनच “पांगलेल्या प्रार्थना” हा कवितासंग्रह आणि व्यक्तिचित्रात्मक लेखांचा संग्रह “राहून गेलेली पत्रे” जन्माला आला.
शालेय शिक्षणापेक्षा शाळाबाह्य उपक्रमांमध्ये रमलेल्या दगडू लोमटे यांच्यातील कवी आणि लेखकाला खऱ्या अर्थाने पोषण मिळाले ते १९८२ साली अंबाजोगाई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात. शाळेत अभ्यासलेल्या कविता आणि पाठ्यपुस्तकांतील कवी-लेखकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी येथे मिळाली. मराठी गझलांचे आद्यकार कवी सुरेश भट यांच्या हृदयस्पर्शी सादरीकरणाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. तेथूनच त्यांनी ठरवले की, आपल्याला साहित्य क्षेत्रातच जगायचे आहे.यानंतर पद्मश्री बाबा आमटे यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने देशातील विविध समाजांची संस्कृती, भाषा आणि समस्या जवळून पाहण्याची संधी मिळाली. बाबा आमटेंची सेवाभावी वृत्ती प्रत्यक्ष अनुभवता आली. याचाच परिणाम म्हणून माझ्यातील साहित्यिक कार्यकर्त्याला नवे बळ मिळाले, असे ते सांगतात.
यशवंतराव चव्हाण यांना अपेक्षित असलेली साहित्य-संस्कृती रुजावी आणि तिचे संवर्धन व्हावे, यासाठी त्यांचे चुलते भगवानराव लोमटे वर्षातून एकदा तीन दिवसीय साहित्य महोत्सवाचे आयोजन करीत. या चळवळीत दगडू लोमटे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या धडपडीची आणि उत्साहाची दखल घेत यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिवपद त्यांच्याकडे आले. गेल्या २८ वर्षांपासून ही जबाबदारी ते अत्यंत यशस्वीपणे सांभाळत आहेत.
४१ वर्षे पूर्ण झालेला हा तीन दिवसीय साहित्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी ते मराठवाड्यासह कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, बृहन्महाराष्ट्र तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या साहित्य संमेलनांना आणि कवी संमेलनांना आवर्जून उपस्थित राहतात. उत्कृष्ट लेखन, प्रभावी सादरीकरण आणि माणुसकी जपणाऱ्या व्यक्तींना शोधून ते आपल्या संमेलनात आमंत्रित करतात.
ते अभिमानाने सांगतात की, साहित्यिकांबरोबरच संगीत वारसा लाभलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील गायक-वादकांनाही आम्ही मंच दिला आहे. आजवर विं.दा. करंदीकर, विठ्ठल वाघ, अरुण म्हात्रे, नारायण सुर्वे, रामदास फुटाणे, वसंतराव देशपांडे, सी. आर. व्यास, राहुल देशपांडे, सतीश व्यास, एम. राजम, आरती अंकलीकर-टिकेकर अशा अनेक दिग्गजांचा सहभाग या साहित्य समारोहात झाला आहे.
यशस्वी आयोजनासाठी आर्थिक पाठबळ, मनुष्यबळ आणि योग्य नियोजन या त्रिसूत्रीचा ते कटाक्षाने अवलंब करतात. अतिथी कवी-लेखक येण्यापासून ते त्यांच्या प्रस्थानापर्यंत आदरातिथ्य यथोचित होईल, याची ते पूर्ण दक्षता घेतात. विशेष मेहनत घेऊन सादरीकरण करणाऱ्या कवी-लेखकांना मानधन देण्याची परंपराही त्यांनी रूढ केली आहे.
ही साहित्य चळवळ वर्षभर सुरू राहावी आणि नवोदित लेखक, कवी, गझलकारांना पोषक वातावरण मिळावे, यासाठी मराठवाडा साहित्य परिषद (शाखा अंबाजोगाई), मासिक संगीत मैफिली आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सातत्याने साहित्य मैफिली आयोजित केल्या जातात. अंबाजोगाईमध्ये संगीताची विशेष रुची जपली जाते. या रुचीला व्यापक आयाम देण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाते. यामुळेच महाराष्ट्रातील सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरांमध्ये अंबाजोगाईचा समावेश होतो, असे ते आत्मीयतेने सांगतात.
साहित्य चळवळ उभारत असतानाच त्यांनी मानवी दृष्टिकोन आणि करुणा जपत मानवी नाती संवेदनशीलतेने गुंफली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील मराठी व उर्दू गझल लिहिणारा नवोदित कवी आबेद शेख अत्यंत विवंचनेत होता. त्याची परिस्थिती पाहून त्यांनी त्याला आर्थिक मदत केली. नंतर सहज भेटीत आबेद शेख म्हणाला, “तुमच्या मदतीमुळे यंदा माझ्या घरी ईद साजरी होणार आहे, आणि त्याचा पहिला मान तुम्हालाच जातो.”हे शब्द ऐकून दगडू लोमटे यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. त्या गुणवंत कवीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांनी अनेक कार्यक्रम दिले आणि मानधनही मिळवून दिले. अशा असंख्य प्रसंगांतून त्यांच्या मातृहृदयाची प्रचिती येते.
याच सामाजिक जाणिवेतून नवसाहित्य लिहिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी निलेश चव्हाण, अविनाश भारती, सय्यद चांद तरोडकर, सुनील उबाळे, डी. के. शेख, गुंजन पाटील अशा अनेक कवींना पुन्हा पुन्हा व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न ते करीत असतात.
Bसाहित्य-संस्कृती रुजविण्याच्या आणि फुलविण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शांतीवन बाबा आमटे उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार, संगीत क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी मारवा फाउंडेशन, पुणे यांचा पं. अण्णासाहेब गुंजकर स्मृती पुरस्कार, उर्दू मुशायऱ्यांसाठी भुसावळ येथील अनिक फाउंडेशनचा ‘साहब-ए-एजाज’ सन्मान, जमाते हिंद अंबाजोगाई सामाजिक सौहार्द पुरस्कार तसेच श्री अनंतपाळ साहित्य सेवा पुरस्कार (शिरूर, जि. लातूर) यांनी गौरविण्यात आले आहे.
ते म्हणतात की, आज नवोदित कवी-लेखक निसर्ग, प्रेम, करुणा, स्त्रीविश्व आणि दुःखी-कष्टकऱ्यांच्या जाणीवा अधिक ताकदीने गझल व कवितांच्या माध्यमातून मांडत आहेत. त्यांच्यासाठी भविष्यात विशेष योजना आखण्याचा मानस आहे.
या लेखाच्या माध्यमातून ते नवोदित कवी-लेखकांना सांगू इच्छितात की, प्रस्थापित कवी-लेखकांचा प्रभाव जरूर घ्या; पण तुमच्या लिखाणाला स्वतःची स्वतंत्र शैली असली पाहिजे. तेव्हाच ते अजरामर ठरेल.
दुर्दम्य इच्छाशक्ती, करुणा आणि मानवतेला चहुबाजूंनी स्पर्श करणारा हा कार्यकर्ता साहित्य-संस्कृती रुजविण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी जे अखंड कार्य करीत आहे, त्याला असेच भरघोस यश मिळत राहो—यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.





