अपघात कसे थांबतील?

काल समृद्धी महामार्गावर पुन्हा एक अपघात झाला. भरधाव येणारी बस एका ट्रकला जाऊन भिडली. त्यात जीवितहानी फारशी झाली नसली तरी एकूणच ज्या पद्धतीने अपघातांची मालिका सुरू आहे, ती पहिली म्हणजे आपल्या अंगावर काटा उभा राहतो. आपल्या देशात चकचकीत आणि गुळगुळीत रस्ते बरेच झाले आहेत. यामुळे जबरदस्त वेगात गाड्या येतात. गेल्या वर्षी रस्ते अपघातात दीड लाखाच्या वर मृत्यू झाले आहेत.

ज्या राज्यात मृत्यू होतात त्या राज्यांचे मुख्यमंत्री अपघातात मृताच्या वारसाला रोख रक्कम देतात. पंतप्रधानही शोक व्यक्त करतात आणि तेही रोख रक्कम देतात. मोठे अपघात झाले तर पाहणीही करतात. पण हे अपघात का होतात, ते रोखण्यासाठी काय केले पाहिजे यावर कोणी काहीही करत नाही. आता आपल्या समृद्धी महामार्गावर एअर अँब्युलन्स राहणार आहे.

म्हणजे एखाद्या हेलिकॉप्टरची व्यवस्था होईल. अपघातात जखमी झालेल्यांना मदतही होईल. म्हणजे पुन्हा सरकारी खर्च वाढला आणि अपघात कुठे होतो तिथेही एअर अँब्युलन्स पोहोचायला किती वेळ लागेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. आम्ही या सदरात वारंवार लिहिले आहे की, ९० टक्के अपघात आपल्यामुळे झालेले आहेत. गाडी फार जुनी असणे, कधी गाडीसमोर एखादा प्राणी येणे, टायर फुटणे, मार्गावर दाखवलेल्या फलकाप्रमाणे वेगमर्यादा न पाळणे, दोन गाड्यांमध्ये किमान २०० मीटरचे अंतर नसणे ही बहुतेक अपघातांची कारणे आहेत. समृद्धी महामार्ग समृद्ध करण्यासाठी हा मार्ग कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेतली आहे.

गाडी सरळ चालवताना आपोआपच वेग वाढत असतो असा आमचा अंदाज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा रस्ता सिमेंटचा आहे त्यामुळे गरम होणारा सिमेंटचा रस्ता त्यामुळे टायरचे तापणे आणि लागोपाठ गाडी पळवणे यामुळे टायर फूट शकतात. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, कितीही घाई असली तरी या मार्गावरून जाताना दर २०० कि. मी. वर एक थांबा दिसला पाहिजे आणि तिथे १०-१५ मिनिटे थांबून चहापाणी करूनच पुढे गेले पाहिजे. अडचण अशी आहे की प्रत्येकाला घाई असते. आणि या सरळसोट रस्त्याने जाताना गाडी चालकाला डुलकी लागू शकते. या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दिवसभर काम करून विश्रांती न घेता बिनधास्तपणे गाडी चालवू नये.

गाडी चालवताना चालकाची झोप पूर्ण झालीच पाहिजे. अनेकदा चालक दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट वगैरेंचे सेवन करतो. त्यातल्या त्यात आजकाल चालकाजवळ असलेला मोबाईल वाजला रे वाजला की तो कानाजवळ जातो. कानामागून आलेला हा मोबाईल आता तिखट झाला आहे आणि बिकट झाला आहे. अनेकदा टायर बदलण्याचे आपण टाळतो. हे सर्व कमी म्हणून की काय आपण मोठ्या आवाजात गाणी वाजवतो. या सर्व कारणांमुळे अपघात होतो. अपघात झाला म्हणजे आपण भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला पश्चातबुद्धी येते.

अशा प्रकारे अपघाताची जी जी कारणे आहेत त्या कारणांचा विचार करता नियमांचे पालन केले तर दररोज होणारे अपघात कमी होऊ शकतात. ज्या ठिकाणी जाण्यासाठी ५ तास लागतात तेथे आम्ही ४ तासात कसे पोहोचलो याची फुशारकी मारणारे अनेक जण दिसतील. त्याला प्रेमाने सांगितले पाहिजे, बाबा रे, ५ तासांचा प्रवास ४ तासात केल्याचा मूर्खपणा करू नका. इतर अनेक बाबींचा विचार करता देशातील रस्ते खूप चांगले झाले आहेत. यामुळेच आता सर्वानी आपले डोके ठिकाणावर ठेवून त्या डोक्याचा उपयोग प्रवास सुखकर करण्यात करावा आणि अपघाती मृत्यू म्हणजे निष्काळजीपणाने ओढवून घेतलेले मृत्यू आहेत हे खोटे ठरवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *