नवी दिल्ली, दि.१४। वृत्तसंस्था दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाबाहेरील रस्त्यावर पाणी साचले आहे. पूर यमुना बाजार, लाल किल्ला, राज घाट आणि खडइढ-काश्मीरी गेटपर्यंत पोहोचला. येथे २० फुटांपर्यंत पाणी भरले होते. याशिवाय मजनू का टीला, निगम बोध घाट, मठ मार्केट, वजिराबाद, गीता कॉलनी आणि शाहदरा परिसराला सर्वाधिक फटका बसला आहे. सखल भाग रिकामा करण्यात आला आहे परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ड्रेनेज दुरुस्त करण्यासाठी लष्कराची मदत घेतली. दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार, आयटीओजवळील ड्रेनेज क्रमांक १२ चे रेग्युलेटर तुटल्याने पुराचे पाणी येत आहे.
मुख्यमंत्री म्हणाले – रेग्युलेटर आज दुरुस्त केले जाईल. एनडीआरएफच्या १६ तुकड्या लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. २,७०० मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. गुरुवारी यमुनेच्या आसपास २३ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. एनडीआरएफचे डीआयजी मोहसिन शाहिदी यांनी सांगितले की, दिल्लीतील ६ जिल्हे पुरामुळे प्रभावित झाले आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल असा अंदाज आहे. पुरामुळे तीन जलशुद्धीकरण केंद्र बंद करावे लागले, त्यामुळे पुढील एक-दोन दिवस दिल्लीला २५ टक्के कमी पाणी मिळेल. राजधानीतील सर्व शाळा आणि महाविद्यालये रविवारपर्यंत बंद राहणार आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये घरून काम करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. अनेक भागात पाणी साचल्याने दिल्ली वाहतूक पोलिसांनी मार्ग बदलले आहेत.