मुंबईच्या तलावांत २२ टक्केच पाणीसाठा!

मुंबई, दि.१३। प्रतिनिधी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत गेल्या २४ जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसामुळे ४,००,१४१ दशलक्ष लिटर (२७.६५ टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. मुंबईला दररोज होणारा ३,८५० दशलक्ष पाणीपुरवठा पाहता हा पाणीसाठा पुढील १०३ दिवस पुरेल इतका आहे. मात्र सध्या दहा टक्के पाणीकपात सुरू असल्याने त्याप्रमाणे निष्कर्ष काढल्यास सदर पाणीपुरवठा हा पुढील ११५ दिवस पुरेल इतका आहे. मात्र गतवर्षी याच दिवसापर्यंत सात तलावांत मिळून ७,२८,३८६ दशलक्ष लिटर (५०.३२ टक्के) इतका पाणीसाठा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावांत ३,२८,१४५ दशलक्ष लिटर इतका (२२.६७ टक्के) पाणीसाठा कमी आहे. मुंबई शहराला मुंबईतील विहार व तुळशी या अगदी छोट्या क्षमतेच्या दोन तलावांतून आणि १५० किमी दूर अंतरावरील ठाणे जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा या पाच तलावांतून असे एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.

मात्र मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबर रोजीपर्यंत सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा असणे आवश्यक असते. मात्र यंदा पावसाचे आगमन २४ जून रोजी उशिराने झाले. त्यातही अपेक्षित पाऊस पडत नसल्याने तलावांतील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ होत झालेली नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावांत २२.६७ टक्के पाणीसाठा कमी आहे. मुंबई महापालिकेने तलावातील पाणीसाठचा आढावा घेऊनच १ जुलैपासून मुंबई व मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो त्या ठाणे, भिवंडी, निजामपूर पालिका क्षेत्रातही १० टक्के पाणीकपात लागूं केली. त्यामुळे सध्या मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर ऐवजी ३,४६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *