महाराष्ट्र

इंदापूर बनणार राज्याचं नवं ‘इंडस्ट्रियल हब’? १००० एकरवरील ‘रत्नपुरी’ एमआयडीसीला मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी!

विशेष प्रतिनिधी:इंदापूर तालुक्याच्या विकासाला आता बुलेट ट्रेनचा वेग मिळणार असून, इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची रत्नपुरी मळ्यातील एक हजार एकर जमीन अधिकृतपणे ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारताच इंदापूरच्या औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशा केल्याने, हा निर्णय तालुक्यासाठी एक सुवर्णक्षण मानला जात आहे.

हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून, इंदापूरला पुणे आणि बारामतीच्या तोडीचे औद्योगिक केंद्र बनवण्याची ही एक मोठी झेप आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरच्या औद्योगिक विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, त्याला आता खऱ्या अर्थाने मूर्त रूप मिळाले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकल्पासाठी केलेला दीर्घकालीन पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला असून, या निर्णयामुळे इंदापूरमध्ये आता मोठ्या उद्योगांचा आणि परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हजारो तरुणांच्या हाताला मिळणार काम!

या नव्या एमआयडीसीमुळे इंदापूर, बारामती आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. रत्नपुरी मळ्यातील ही भव्य औद्योगिक वसाहत स्थानिक उद्योजकतेला चालना देण्यासोबतच लॉजिस्टिक आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी भर टाकणार आहे. शेतीसोबतच आता उद्योगधंद्यांची जोड मिळाल्याने इंदापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात ज्याप्रमाणे औद्योगिक विकास झाला, तसाच विस्तार आता इंदापूरच्या दिशेने होणार असल्याने गुंतवणूकदारांच्या नजरा या प्रकल्पाकडे लागल्या आहेत. “इंदापूरच्या इतिहासातील हा एक ‘गेम चेंजर’ निर्णय असून, लवकरच इथले चित्र बदललेले दिसेल,” असा विश्वास स्थानिक राजकीय धुरिणांकडून व्यक्त केला जात आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *