मंत्रालयातील ‘लाल रेषेचा’ ५० हजारांचा फास; झिरवळांच्या दालनातील त्या ‘सिक्रेट कोड’ने महाराष्ट्र हादरला!
मुंबई | विशेष प्रतिनिधीमंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील सत्तेच्या सर्वोच्च दालनात सर्वसामान्यांची कामे फाईलवरील मजकुरावरून नाही, तर एका ‘सिक्रेट कोड’वरून होतात, असा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगेला लाच घेताना पकडल्यानंतर, आता या भ्रष्टाचाराच्या ‘स्टिंग ऑपरेशन’ने खळबळ उडवून दिली आहे. तक्रारदार निर्मल शर्मा यांनी समोर आणलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. मंत्र्यांच्या कार्यालयात फाईलवर मारलेल्या एका रेषेची किंमत ५० हजार, तर दोन रेषांची किंमत १ लाख रुपये इतकी ठरलेली असते, असा दावा शर्मा यांनी केला आहे.
या भ्रष्टाचाराच्या साखळीचे धागेदोरे थेट मंत्र्यांच्या खासगी सचिवापर्यंत पोहोचत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. “माझ्या मेडिकल दुकानाचा परवाना निलंबित झाल्याने मी अपीलासाठी गेलो होतो. तिथे सुनावणी खुद्द मंत्री घेण्याऐवजी त्यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांनी घेतली. गाडे यांनी माझ्या फाईलवर दोन रेषा मारल्या आणि मला लिपिक ढेरिंगेशी बोलायला सांगितले. त्या दोन रेषांचा अर्थ १ लाख रुपये असा होता,” असे शर्मा यांनी सांगितले. मंत्रालयात येणाऱ्या ९० टक्के लोकांकडून याच पद्धतीने ‘कोडिंग’च्या माध्यमातून पैसे उकळले जातात, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या व्यवहारात मंत्र्यांची भेट होऊ नये म्हणून कार्यालयातील कर्मचारी विशेष खबरदारी घेतात. तक्रारदाराने मंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना अडवून पुन्हा त्याच भ्रष्ट साखळीकडे पाठवण्यात आले. “राजू ढेरिंगेने मला सांगितले की, आम्हाला वरच्या लोकांना पैसे द्यावे लागतात,” असा दावाही शर्मा यांनी व्हिडिओ पुराव्यासह केला आहे. मंत्रालयातील या ‘रेषांच्या खेळाने’ प्रशासकीय पारदर्शकतेचे धिंडवडे काढले असून, मंत्र्यांच्या अगदी नाकाखाली सुरू असलेल्या या वसुली रॅकेटमध्ये अजून किती बडे अधिकारी सामील आहेत, याचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे.
—
Deepak Kaitke




