मुंबई

कागदावरची झाडं आता अ‍ॅपमध्ये दिसणार! महामार्गावरील वृक्षलागवडीचा ‘डिजिटल पहारा’; महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाला दिल्लीत राष्ट्रीय सलाम

मुंबई, विशेष प्रतिनिधी:रस्त्यांच्या बांधकामात झाडे तोडली जातात, पण लावली जातात का? या जुन्या प्रश्नाला आता महाराष्ट्र सरकारने तंत्रज्ञानाच्या मदतीने चोख उत्तर दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या ‘Tree Plantation and Monitoring App’ या सुविधेला रस्ते व महामार्ग गटात राष्ट्रीय स्तरावरील ‘Digital Innovation of the Year’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नवी दिल्लीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सन्मान राज्याला प्रदान करण्यात आला.

​सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विभागाने हे अ‍ॅप तयार करून वृक्षलागवडीच्या प्रक्रियेत मोठी क्रांती घडवून आणली आहे. पूर्वी वृक्षलागवडीचे अहवाल केवळ कागदावर असायचे, मात्र आता या अ‍ॅपमुळे लावलेल्या प्रत्येक झाडाचे ‘जिओटॅगिंग’ (Geotagging) अनिवार्य करण्यात आले आहे. झाड कोणत्या खड्ड्यात लावले, त्याची उंची किती, त्याला ट्री गार्ड लावला आहे का, याचे थेट फोटो अक्षांश-रेखांशासह अ‍ॅपवर अपलोड करावे लागतात.

​या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘रिअल टाइम मॉनिटरिंग’. केवळ झाड लावून भागणार नाही, तर ठराविक कालावधीनंतर त्या झाडाची वाढ कशी होत आहे, याचेही फोटो कनिष्ठ अभियंत्यापासून कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वांना डिजिटल पडताळणीद्वारे नोंदवावे लागतात. यामुळे चुकीच्या माहितीला किंवा बोगस अहवालांना पूर्णपणे चाप बसला आहे. सध्या ८.२० लाख वृक्षांची नोंद डिजिटल रेकॉर्डवर आली असून, पुढील टप्प्यात १५ लाख झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
​विभागाचे सचिव संजय दशपुते यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन या यशाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाला आता ‘शाश्वत आणि पारदर्शक’ तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या पर्यावरणपूरक रस्ते विकासाचे मॉडेल आता देशासाठी पथदर्शक ठरणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *