नवी दिल्ली, दि.७। वृत्तसंस्था संसद सदस्यत्व बहाल केल्यानंतर १३७ दिवसांनी राहुल गांधी सोमवारी संसद भवनात पोहोचले. संसदेत पोहोचताच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत न्यूज क्लिकचा मुद्दा उपस्थित केला. दुबे म्हणाले, चीनच्या पैशाने देशात पंतप्रधान मोदींच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले. न्यूज क्लिकमध्ये चीनमधून पैसा आला. हे देशविरोधी आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काँग्रेस, चीन आणि न्यूज क्लिक नाळ जोडलेले आहेत.
राहुल गांधींच्या ‘नकली मोहब्बत की दुकानप’मध्ये चिनी वस्तू स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. त्यांचे चीनवरील प्रेम दिसून येते. ते भारतविरोधी मोहीम राबवत आहेत. दुपारी सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हा लोकसभेत डिजिटल पर्सनल डेटा संरक्षण विधेयक २०२३ मंजूर करण्यात आले. हा कायदा झाल्यामुळे डेटा गोळा करणाऱ्या कंपन्यांना ते कोणता डेटा घेत आहेत आणि डेटा कशासाठी वापरायचा आहे हे सांगावे लागेल. कंपन्यांना वापरकर्त्यांना संपर्क तपशील देखील द्यावा लागेल. वापरकर्त्यांना त्यांचा वैयक्तिक डेटा बदलण्याचा किंवा हटविण्याचा अधिकार देखील असेल. राहुल यांच्या संसद सदस्यत्वाच्या पुनर्स्थापनेबाबत आज सकाळपासून सस्पेन्स होता.