टॉप स्टोरी राजकारण

कुटुंबातच सत्तेचा पेच: मंत्री जयकुमार गोरेंच्या बालेकिल्ल्यात बंधूचा पराभव, पण वहिनीचा विजय कसा ठरला चर्चेचा?

विशेष प्रतिनिधी:राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मंत्री जयकुमार गोरे यांच्या कुटुंबातच विजयाचा आणि पराभवाचा विचित्र संगम पाहायला मिळाला आहे. आपल्या बंधू आणि वहिनीला निवडून आणण्यासाठी जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यात सर्व शक्ती पणाला लावली होती. मात्र, कुकडवाड गटातील मतदारांनी त्यांचे बंधू अरुण गोरे यांना धक्कादायक कौल देत पराभवाची धूळ चारली. मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सख्ख्या भावाचा झालेला हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

​मात्र, याच वेळी औंध गटातून त्यांच्या वहिनी भारती गोरे यांनी मिळवलेला विजय जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या गटात विजयाचे पारडे शेवटच्या क्षणापर्यंत हेलकावे खात होते. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडतरे ४० मतांनी विजयी झाल्याची चर्चा असतानाच, भाजपच्या आक्षेपानंतर करण्यात आलेल्या फेरमतमोजणीत भारती गोरे यांनी बाजी मारली. भावाचा पराभव आणि वहिनीचा नाट्यमय विजय यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांची अवस्था ‘एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू’ अशी झाली आहे. एकाच घरातील या दोन निकालांनी मतदारांच्या बदलत्या मानसिकतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *