रस्त्यांवरील ‘यमदूत’ रोखण्यासाठी आता सरकारची धडक कारवाई; प्रताप सरनाईकांचा मोठा आदेश, आरटीओचे धाबे दणाणले?
विशेष प्रतिनिधी:महामार्गावर होणारे भीषण अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप बळी रोखण्यासाठी आता राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण राज्यात अवजड वाहनांची ‘कोम्बिंग ऑपरेशन’ प्रमाणे तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या धडक मोहिमेमुळे महामार्गावर नियम धाब्यावर बसवून धावणाऱ्या वाहनचालकांचे आणि भ्रष्ट यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
मंत्रालयात झालेल्या एका तातडीच्या बैठकीत सरनाईक यांनी स्पष्ट केले की, ३ फेब्रुवारीच्या अपघातामुळे प्रवाशांना सोसाव्या लागलेल्या ३२ तासांच्या यातना पुन्हा सहन केल्या जाणार नाहीत. “चालकांचा बेजबाबदारपणा आणि ओव्हरटेकिंगची जीवघेणी स्पर्धाच मृत्यूला आमंत्रण देत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. केवळ दंडात्मक कारवाई करून न थांबता, आता प्रत्येक अवजड वाहनाची तांत्रिक क्षमता पारदर्शकपणे तपासली जाणार आहे.
फिटनेस सर्टिफिकेटच्या ‘खेळा’वर येणार गदा!
या मोहिमेचा सर्वात मोठा फटका आरटीओ कार्यालयांना बसण्याची शक्यता आहे. काही कार्यालयांतून संशयास्पद रितीने मोठ्या प्रमाणात वाहन योग्यता प्रमाणपत्रे (फिटनेस सर्टिफिकेट) वाटली गेल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देत त्यांनी पारदर्शकतेचा बडगा उगारला आहे. महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट्स’वर आता केवळ फलक नसतील, तर तिथे पोलीस आणि परिवहन विभागाचे पथक चालकांचे समुपदेशन करण्यासाठी सज्ज राहणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या संपूर्ण मोहिमेचा आणि रस्ते सुरक्षेच्या कायमस्वरूपी आराखड्याचा अहवाल सादर करण्याचे बंधन प्रशासनावर घालण्यात आले आहे. “नियम फक्त कागदावर नकोत, तर ते रस्त्यावर दिसले पाहिजेत,” या मंत्र्यांच्या भूमिकेमुळे आता महामार्गावरील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.
—
Deepak Kaitke




