टॉप स्टोरी राजकारण

भाषेची अस्मिता म्हणजे आजार?’; राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर तिखट वार, पत्रातून मोदी सरकारलाही केलं लक्ष्य!

मुंबई, विशेष प्रतिनिधी:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेसाठी आग्रही राहण्याला ‘आजार’ संबोधल्याने राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या विधानावर आगपाखड करत, भागवतांना त्यांच्याच शैलीत चोख प्रत्युत्तर दिले आहे. “भाषेवर प्रेम करणे जर आजार असेल, तर हा आजार तुमच्या गुजरातसह संपूर्ण देशात आहे; तिथे जाऊन तुम्ही उपदेश का देत नाही?” अशा बोचऱ्या शब्दांत राज ठाकरेंनी भागवतांच्या भूमिकेचे वाभाडे काढले आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले की, मुंबईत झालेल्या कार्यक्रमात हजर असलेली मंडळी ही भागवतांच्या प्रेमापोटी नाही, तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या धाकामुळे आली होती. त्यांनी पुढे विचारले की, दक्षिण भारतात किंवा बंगालमध्ये जेव्हा भाषेसाठी तीव्र आंदोलने होतात, तेव्हा संघाला हा आजार का दिसत नाही? विशेषतः गुजरातमध्ये उत्तर भारतीय कामगारांना जेव्हा हाकलून दिले जाते, तेव्हा संघ तिथे समरसतेचे धडे का गिरवत नाही, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

संघाच्या तथाकथित ‘अराजकीय’ प्रतिमेवरही राज ठाकरेंनी कडाडून टीका केली. “स्वतःला अराजकीय म्हणवून घेणाऱ्या संघाने मराठी माणसाला डिवचण्याचे काम करू नये. हिंमत असेल तर केंद्र सरकार जे बळजबरीने ‘हिंदी’ लादत आहे, त्यांचे कान उपटून दाखवा,” असे आवाहन त्यांनी दिले. ‘मराठी माणूस शांत आहे आणि राज्यातील सत्ताधारी कणाहीन आहेत म्हणूनच भागवतांची बोलण्याची हिंमत वाढली आहे,’ अशी टीका करत त्यांनी राज्यातील राजकारण्यांनाही आरसा दाखवला.

हिंदुत्वाच्या नावाखाली चालणाऱ्या राजकारणावरही त्यांनी बोट ठेवले. २०१४ पासून गोमांस निर्यातीत (Beef Export) भारताचा क्रमांक वाढल्याचा उल्लेख करत, “या व्यापाऱ्यांवर कारवाई करायला सरकारला कधी सांगणार?” असा प्रश्न त्यांनी भागवतांना विचारला. हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली होणारा धिंगाणा आणि कावड यात्रेतील अश्लीलतेवर मोहन भागवत कधी मौन सोडणार, असा सवाल करत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. “मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच आमच्यासाठी सर्वोच्च असून, आमच्या अस्मितेवर आघात झाल्यास महाराष्ट्र कधीही शांत बसणार नाही,” असा सज्जड दमही त्यांनी पत्राच्या शेवटी दिला आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *