राजकारण

राजकीय शत्रू पण सोयरिकीत मित्र? पवार-सुळे घराण्यातील शाही विवाहासाठी गडकरी-फडणवीसांचा पुढाकार!

विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे नेते एका खास कौटुंबिक कारणासाठी एकत्र आले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सुपुत्री रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, ही सोयरिक जुळवण्यात भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थाची भूमिका बजावल्याची धक्कादायक मात्र रंजक माहिती समोर आली आहे. या बातमीने संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेवती सुळे यांचा विवाह ‘विश्वराज ग्रुप’चे सर्वेसर्वा अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्याशी निश्चित झाला आहे. या दोन बड्या घराण्यांना एकत्र आणण्यासाठी भाजपच्या शीर्ष नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे या आनंदाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले. राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते कौटुंबिक स्तरावर किती सलोख्याचे संबंध जपतात, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च विद्याविभूषित असलेल्या रेवती सुळे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये आपल्या आईसाठी केलेल्या जोरदार प्रचारामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. तर त्यांचे होणारे पती सारंग लखानी हे केवळ उद्योजक नसून एक उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू म्हणूनही परिचित आहेत.

हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नसून दोन भिन्न राजकीय विचारधारांच्या नेत्यांनी एकत्र येऊन जुळवलेला एक अनोखा ऋणानुबंध ठरला आहे. आता सर्वांचे डोळे या भव्य विवाह सोहळ्याच्या तारखेकडे आणि ठिकाणाकडे लागले आहेत.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *