मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेत्यांची हायहोल्टेज ड्रामा अन् पोलिसांशी जोरदार खडाजंगी; ‘अजितदादांना न्याय मिळेना, तर सामान्यांचं काय?’
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे प्रकरण आता पूर्णपणे पेटले असून, मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आज आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू होतो आणि पुरावे देऊनही पोलीस गुन्हा दाखल करायला का घाबरतात?” असा संतप्त सवाल विचारत या नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये झालेली बाचाबाची आणि जोरदार वादावादीचे व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील केबिनमध्ये जेव्हा हे नेते दाखल झाले, तेव्हा वातावरणात प्रचंड उष्णता होती. रोहित पवार यांनी थेट डीजीसीए (DGCA) आणि व्हीएसआर (VSR) कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. डीजीसीएने नुकताच व्हीएसआर कंपनीच्या ५ विमानांवर बंदी घातल्याने ही कंपनी अपघाताला जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे सिद्ध झाले आहे, असा दावा पवारांनी केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी केवळ ‘तक्रार अर्ज’ घेण्याची भूमिका घेतल्याने वाद अधिक चिघळला. “तक्रार अर्जाचं चाटायचं काय? आम्हाला एफआयआर (FIR) हवाय,” अशा शब्दांत नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस उपायुक्त (DCP) प्रवीण मुंढे तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी रोहित पवार आणि उपायुक्त मुंढे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. “आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करू,” असे आश्वासन पोलिसांनी दिले, मात्र “जर उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यू प्रकरणात असा वेळकाढूपणा होत असेल, तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?” असा रोकठोक सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना केबिनबाहेर काढले असले तरी, नेते आणि त्यांचे वकील आपल्या मागणीवर ठाम राहून केबिनमध्येच ठिय्या मांडून बसले होते.
डीजीसीएचा अहवाल आणि विमान कंपनीचा निष्काळजीपणा हे दोन्ही मुद्दे समोर आल्यानंतरही पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला आहे. “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही,” या भूमिकेमुळे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले असून, सरकार आणि पोलीस प्रशासनासमोर आता पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणातील गूढ आणि नेत्यांची ही आक्रमक पवित्रा यामुळे येत्या काही तासांत मुंबईत राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.




