टॉप स्टोरी राजकारण

‘त्या’ विमान अपघातामागे काळंंबेरं? रोहित पवारांचा थेट मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धडक; DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी!

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता केवळ चौकशीपुरते मर्यादित न राहता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी आज मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेत, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) विरोधातच गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे. “दादांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ,” असा इशारा देत रोहित पवारांनी यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत.

संबंधित विमान कंपनी ‘VSR’ वर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. “२८ जानेवारीला DGCA ने जो अहवाल दिला, तो म्हणजे केवळ धूळफेक आहे. कंपनीच्या विमानांची उड्डाणे रोखून काय साध्य होणार? मुळात कंपनीच्या मालकाला आणि या प्रकरणाशी संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत,” असे रोहित पवार यांनी यावेळी ठणकावून सांगितले. या कंपनीचे एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्याशी असलेले आर्थिक संबंधही तपासाच्या फेऱ्यात यायला हवेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
यावेळी रोहित पवारांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्यावरही निशाणा साधला. “नैतिकता जपून मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा. या अपघाताचा तपास ज्या दिशेने जायला हवा, त्या दिशेने तो जात नाहीये. उलट २८ तारखेलाच कंपनीला ‘क्लीन चीट’ देण्याचा घाट घातला गेला,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला. आज जर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी FIR नोंदवला नाही, तर उद्या बारामतीमध्ये जनतेसह पोलीस ठाण्याबाहेर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुढील दोन दिवसांत रोहित पवार आणखी एक मोठी पत्रकार परिषद घेणार असून, त्यात काही खळबळजनक पुरावे समोर मांडणार असल्याचे समजते. “जोपर्यंत दोषी तुरुंगात जात नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” या भूमिकेमुळे आता या विमान अपघाताच्या प्रकरणावरून दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण तापण्याची शक्यता आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *