सिन्नर । आर्थिक अडचणीत आलेल्या सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेने थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेत जप्त मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेला वेग दिला आहे. संस्थेकडील प्रलंबित कर्ज वसुलीसाठी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली थेट लिलावाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
यापूर्वी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील संबंधित अधिकारी स्तरावर या वसुली प्रक्रियेकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची चर्चा होती. त्यामुळे ठेवीदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सध्याचे सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी पुढाकार घेत प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला आणि वसुली प्रक्रियेला गती दिली. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रशासनिक पातळीवर आवश्यक ती पावले उचलल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. संस्थेच्या वतीने थकबाकीदारांना वारंवार नोटिसा देऊन थकबाकी भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र निर्धारित कालावधीत थकबाकी न भरल्याने जप्त मालमत्ता लिलाव प्रक्रियेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात सिन्नर तालुक्यातील आठ मालमत्तांचा लिलाव २७ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे संबंधित प्रकरणे दाखल करण्यात आली असून लिलाव प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.




