नाशिक

नाशिकमध्ये भरणार मराठीचा ‘जागतिक’ दरबार! साहित्याचा उत्सव की अस्मितेचा सोहळा? दिग्गजांच्या उपस्थितीत उलगडणार भाषेचे भविष्य

विशेष प्रतिनिधी,नाशिक: गोदावरीच्या तीरावर वसलेली नाशिक नगरी आता एका ऐतिहासिक आणि जागतिक सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा सुगंध जगभर पसरवण्यासाठी ‘चौथे विश्व मराठी संमेलन’ नाशिकमध्ये रंगणार आहे. येत्या २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी म.वि.प्र. समाज संस्थेच्या के.टी.एच.एम. कॉलेजच्या विस्तीर्ण प्रांगणात हा मराठी भाषेचा महाकुंभ भरणार असून, जगभरातील मराठी प्रेमींचे डोळे या सोहळ्याकडे लागले आहेत.
सत्ताधारी आणि साहित्याचा अपूर्व संगम
शुक्रवारी दुपारी ३ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत आणि नरहरी झिरवाळ यांसारख्या मंत्र्यांची फौज उपस्थित राहणार आहे. राजकीय दिग्गजांसोबतच नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आणि जगभरातील नामवंत साहित्यिक, कलाकार व उद्योजक या संमेलनात मराठीचा जयघोष करतील.
पुरस्कारांची मोहोर आणि मानाची उपस्थिती
या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ‘साहित्य भूषण’, श्रीनिवास कुलकर्णी यांना ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ आणि मारुती बाबा कुरेकर यांना ‘विश्व मराठी विशेष पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. सदानंद मोरे, डॉ. रवींद्र शोभणे, लक्ष्मीकांत देशमुख आणि आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष वैचारिक उंची प्राप्त होणार आहे.
काय आहे या संमेलनाचे ‘मिशन’?
केवळ भाषणे आणि सत्कार न राहता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठीला ‘डिजिटल’ कसे बनवायचे, यावर या संमेलनात विशेष मंथन होईल. परदेशात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांना एकत्र आणून मराठी साहित्याचा जागतिक भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी दिशा ठरवली जाणार आहे. नव्या पिढीला मराठी भाषेचा अभिमान वाटवा, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि स्वागताध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
सांस्कृतिक वैभवाचा नजराणा
तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या या आंतरराष्ट्रीय सोहळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक पर्यटनाला नवी चालना मिळणार असून, नाशिकची ओळख जागतिक नकाशावर अधिक ठळक होणार आहे.
नाशिकमधील वाचक, रसिक आणि साहित्यप्रेमींनी या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *