टॉप स्टोरी नाशिक

कथित ४०० कोटींची कंटेनर लूट : मुख्य सूत्रधार किशोर सावळा जेरबंद, तपासाला वेग

नाशिक | तब्बल चारशे कोटी रुपयांच्या कथित रोख रकमेच्या कंटेनर लुटप्रकरणी अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुख्य सूत्रधार किशोर सावळा याला अटक करत मोठी कारवाई केली आहे. या अटकेमुळे गेल्या काही महिन्यांपासून गूढ बनलेल्या या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता बळावली असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या तपासाकडे लागून राहिले आहे.
या सनसनाटी प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ संशयितांना अटक करण्यात आली असून, सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. कंटेनरमधून नेमकी किती रक्कम वाहतूक होत होती, ती खरंच ४०० कोटींची रोकड होती का, की हा संपूर्ण प्रकार बनावट कट रचून आखण्यात आला होता, याबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पोलिस तपासातून या कथित लुटीमागे आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याचे संकेत मिळत असल्याने तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईहून नाशिकमार्गे कर्नाटककडे जाणाऱ्या एका कंटेनरची चोर्ला घाट परिसरात लूट झाल्याचा दावा करण्यात आला होता. या कथित घटनेनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत खळबळ उडाली होती. नाशिक ग्रामीण पोलिसांत संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरुवातीला चार संशयितांना अटक करण्यात आली. त्यानंतर तपासाची दिशा बदलत गेली आणि राजस्थानमधील जयपूर येथून विराट सतीश गांधी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत आणखी संशयितांची नावे समोर येत गेल्याने आरोपींची संख्या सातवर पोहोचली. मात्र, मुख्य सूत्रधार किशोर सावळा फरार असल्याने तपासात अडथळे येत होते. अखेर सावळा पोलिसांच्या जाळ्यात अडकताच या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण देणारा मुद्दा म्हणजे कर्नाटक पोलिसांचा थेट नकार. बेळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. हिरेमठ यांनी चोर्ला घाट परिसरात ४०० कोटींच्या कंटेनर लुटीची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्टपणे सांगत हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला होता. त्यामुळे लूट झालीच नसल्याचा कर्नाटक पोलिसांचा दावा आणि नाशिक ग्रामीण पोलिसांचा तपास, या परस्परविरोधी भूमिकांमुळे प्रकरणातील रहस्य अधिकच गडद झाले आहे.एकीकडे दोन्ही राज्यांचे पोलीस संयुक्त तपास करत असतानाच, दुसरीकडे लूट ही केवळ कागदावरच होती का, यावर संशय व्यक्त केला जात आहे.

संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार या कथित कटामागे मोठे आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रे आणि नियोजनबद्ध फसवणूक असण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला असून, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तपास सुरू असून कोणताही निष्कर्ष काढण्याआधी सर्व बाजूंनी सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

कथित ४०० कोटींची लूट, राज्यांतील विरोधाभासी दावे आणि अटकेत असलेले संशयित यामुळे हा तपास नेमका कोणत्या दिशेने जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *